मुंबई: ज्या शिवसेनेने परप्रांतियांना सळो की पळो करून सोडलं, त्याच शिवसेनेच्या (shivsena) मुखपत्रात एक बिहारी माणूस कार्यकारी संपादक म्हणून रुजू होतो… आपल्या धारदार लेखणीनं काँग्रेसवर (Congress) घणाघाती हल्ला करतो… काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधींचा टीकाकार बनतो… पुढे शिवसेना प्रमुखांचे आशीर्वाद मिळतात आणि खासदारही होतो. नंतर हाच माणूस शिवसेना सोडतो आणि काँग्रेसमध्ये येतो. पण तिथेही बंडखोर स्वभाव स्वस्थ बसू देत नाही. पक्ष किंवा पक्षातील एखादा नेता चुकला की जाहीर भूमिका घेतो अन् तरीही पक्षातील आपलं स्थान आणि महत्त्व टिकवून ठेवतो. हा नेता दुसरा तिसरा कोणी नसून हे आहेत ज्येष्ठ काँग्रेस नेते संजय निरुपम. (Sanjay Nirupam) निरुपम यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या राजकीय कारकिर्दीचा घेतलेला हा आढावा.
संजय निरुपम हे बिहारचे आहेत. 6 जानेवारी 1965 ही त्यांची जन्मतारीख. बिहारच्या रोहतासमध्ये त्यांचा जन्म झाला. 1984मध्ये त्यांनी पटणा येथील एका महाविद्यालयातून बीएची पदवी घेतली. त्यानंतर त्यांनी दिल्लीकडे कूच केली. 1988मध्ये ‘इंडियन एक्सप्रेस’ ग्रुपच्या दैनिक ‘जनसत्ता’मध्ये पत्रकार म्हणून कारकिर्दीला सुरुवात केली. पाच वर्ष त्यांनी ‘जनसत्ते’च्या मुंबई आवृत्तीत त्यांनी काम केलं. त्यानंतर 1993मध्ये शिवसेनेच्या ‘दोपहर का सामना’त कार्यकारी संपादक म्हणून ते रुजू झाले. त्याच दरम्यान म्हणजे 10 ऑक्टोबर 1989मध्ये त्यांचा विवाह झाला. त्यांच्या पत्नीचे नाव गीता असून कन्येचं नाव शिवानी आहे.
निरुपम यांचा ‘दोपहर का सामना’चे कार्यकारी संपादक होण्याचा किस्सा रंजक आहे. एक आव्हान म्हणून त्यांनी दोपहर का सामानाचं संपादकपद स्वीकारलं होतं. एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा किस्सा सांगितला होता. मी कोणत्याही दबावाखाली किंवा आकर्षणापोटी सामनाचं संपादक पद स्वीकारलं नाही. मराठी सामनाच्या धर्तीवरच हिंदी सामना सुरू करण्याची शिवसेनेची योजना होती. त्यावेळी सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्यासोबत मी उद्धव ठाकरेंना भेटलो. नंतर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंशी भेट झाली. शिवसेना प्रमुखांसोबत झालेल्या चर्चेतील दोन गोष्टी मला आजही आठवतात. मी शिवसेनाप्रमुखांना विचारलं, आपण वृत्तपत्रं काढत आहोत पण आपलं धोरण काय असेल? त्यावर शिवसेनाप्रमुखांनी अत्यंत महत्त्वाचा सल्ला दिला. त्यांनी दोन गोष्टी महत्त्वाच्या सांगितल्या. एक म्हणजे, जे काही देशविरोधी असेल ते आपल्या वर्तमानपत्रात छापलं जाता कामा नये. देशहित सर्वोच्च असलं पाहिजे. उद्या मी जरी देशहिताच्या विरोधात एखादं विधान केलं असेल तर तेही आपल्या वृत्तपत्रात छापता कामा नये. त्यांनी सांगितलेली दुसरी गोष्टही तितकीच महत्त्वाची आहे. संपादक कसा आगीसारखा धगधगता पाहिजे. त्याने आग होऊन जगलं पाहिजे. ती धगधगती आग गोरगरीबांना आणि नडलेल्यांच्या हिताची पाहिजे. या आगीचा दुरुपयोग होता कामा नये. सामनात काम करताना मला या दोन गोष्टी सदैव आठवणीत राहिल्या, असं निरुपम यांनी सांगितलं होतं.
1996मध्ये शिवसेनेने त्यांना राज्यसभेत पाठवलं होतं. तिथूनच त्यांच्या राजकीय प्रवासास सुरुवात झाली. 1996 ते 2006 पर्यंत ते राज्यसभेचे सदस्य होते. शिवसेनेत अनेक वर्ष राहिल्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. 2005मध्ये काँग्रेसमध्ये आल्यानंतर सोनिया गांधी यांनी त्यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव बनवले. त्यानंतर गोवा, गुजरात आणि नागालँडच्या विधानसभा निवडणुकीच्या पर्यवेक्षकपदाची त्यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली. 2009मध्ये मुंबई उत्तर लोकसभा निवडणुकीत ते विजयी झाले होते.
2014च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने मुंबईतील सहाच्या सहा जागा गमावल्या होत्या. त्यानंतर पक्षाने निरुपम यांच्याकडे मुंबईच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली होती. 2019मध्ये त्यांना मुंबई उत्तर-पश्चिम लोकसभा मतदारसंघातून तिकीट देण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांच्याऐवजी मिलिंद देवरा यांच्याकडे मुंबईच्या अध्यक्षपदाची धुरा देण्यात आली होती.
2014च्या लोकसभा निवडणुकीत निरुपम यांना भाजपचे उमेदवार गोपाळ शेट्टी यांच्याकडून पराभव पत्करावा लागला. गोपाळ शेट्टी यांना 6,64,004 मते मिळाली होती तर निरुपम यांना केवळ 2,17,422 मते मिळाली होती. अर्थात त्यावेळी संपूर्ण देशात मोदी लाट होती. त्यामुळे अनेक मातब्बरांना पराभव स्वीकारावा लागला होता. निरुपम यांनाही पराभवाचा सामना करावा लागला.
2019च्या लोकसभा निवडणुकीतही मोदी लाटेचा प्रभाव कायम होता. या निवडणुकीतही निरुपम यांना पराभव पत्करावा लागला. यावेळी त्यांना शिवसेनेच्या गजानन किर्तीकर यांनी पराभूत केलं. किर्तीकर यांना 5,70,063 मते मिळाली. तर निरुपम यांना केवळ 3,09,735 मते मिळाली.
रामानुजाचार्य यांच्याबद्दल बोलताना मोदींकडून बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख! यामगचा नेमका संदर्भ काय?https://t.co/OrQXQnjsPu#NarendraModiji | #DrBabasahebAmbedkar | #PMModi | #PMModiinHyderabad | #StatueOfEquality | #Ramanujacharya
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 5, 2022
संबंधित बातम्या:
डावी-उजवी विचारधारा म्हणजे काय रे भाऊ? या विचारधारा आल्या कशा? जनक कोण?
चीन पुन्हा तोंडावर आपटला, गलवान घाटीत 38 चीनी सैनिक वाहून गेल्याचा ऑस्ट्रेलियन रिपोर्ट