ठाणे: त्रिपुरातील घटनेचे राज्यातही पडसाद उमटले आहेत. रझा अकादमीने काल भिवंडीत बंद पुकारला होता. तर नांदेडमध्ये रॅली काढण्यात आली होती. रझा अकादमीने नांदेडमध्ये काढलेल्या रॅलीला हिंसक वळण लागले. त्यामुळे पुन्हा एकदा रझा अकादमी चर्चेच आली आहे. मुंबईतील आझाद मैदानात हिंसक आंदोलन ते नांदेड-भिवंडीतील आंदोलनात प्रमुख भूमिका असलेली रझा अकादमी नेमकी काय आहे? त्याचा घेतलेला हा आढावा.
रजा अकादमी पहिल्यांदा वादात आली ती 2012मध्ये. 11 नोव्हेंबर 2012मध्ये रझा अकादमीने आझाद मैदानात एका रॅलीचं आयोजन केलं होतं. म्यानमार आणि आसाममध्ये मुस्लिमांविरोधात झालेल्या हिंसेच्या विरोधात ही रॅली आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी काही मौलवींनी माथी भडकवणारी भाषणं केली. या रॅलीत 15 हजाराच्यावर लोक उपस्थित होती. महिला आणि तरुण मोठ्या प्रमाणावर हजर होते. मौलवींच्या भाषणाने उत्तेजित होऊन काही तरुणांनी आझाद मैदानात जोरदार तोडफोड सुरू केली. जमावाने मीडिया आणि पोलिसांना लक्ष्य केलं. आझाद मैदान आणि आजूबाजूच्या परिसरात रझा अकादमीने तोडफोड केली. त्यानंतर त्यांनी मैदानाबाहेरच्या अमर जवान ज्योतिचीही तोडफोड केली. रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांवर हल्ला करतानाच आझाद मैदाना परिसरात उभ्या असलेल्या गाड्याही पेटवून दिल्या. या जमावाला पांगवणाऱ्या पोलिसांवरही जमावाने हल्ला केला. यावेळी महिला पोलिसांच्या अंगावरही हात टाकण्यात आला. या हल्ल्यात 44 पोलिसांसह 50 लोक जखमी झाले. या हल्ल्यात दोनजणांचा मृत्यू झाला. तर याप्रकरणी 51 लोकांना अटक करण्यात आली. पोलीस मुख्यालयाच्या हाकेच्या अंतरावरच हा प्रकार घडल्याने संपूर्ण राज्यातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या.
कोरोनाच्या काळातही रझा अकादमी शांत बसली नव्हती. कोरोनातून नागरिकांनी मुक्त व्हावं म्हणून भारताने युद्धपातळीवर लस विकसीत केली. जगानेही या लसीला मान्यता दिली. एवढेच नव्हे तर जगाने भारताकडून लसी मागवल्या. बांगलादेश आणि पाकिस्तान सारख्या शेजारील देशांनाही भारताने उदार मनाने लसी पुरविल्या. मात्र, या कोरोना लसींवर रझा अकादमीने संशय व्यक्त केला. या व्हॅक्सिनमध्ये डुकराची चरबी असल्याचा दावा अकादमीने केला. अकादमीचे नेते मौलाना सईद नूरी यांनी जागतिक आरोग्य संघटनेलाच थेट पत्रं लिहिलं. 30 जानेवारी 2020मध्ये हे पत्रं लिहिण्यात आलं होतं. व्हॅक्सिनमध्ये डुकराच्या चरबीचा वापर केला आहे का? असा सवाल या पत्रात करण्यात आला. जर व्हॅक्सिनमध्ये डुकराच्या चरबीचा समावेश असेल तर कोणताही मुस्लिम व्यक्ती ही लस घेणार नाही, असं त्यांनी स्पष्ट सांगितलं. त्यामुळे वाद निर्माण झाला.
23 मार्च 2020 पासून राज्यातील सर्वच धार्मिकस्थळं बंद होती. 16 नोव्हेंबर 2020 रोजी पुन्हा धार्मिकस्थळं सुरू करण्यात आली. त्यामुळे रजा अकादमीचे महासचिव सईद नूरी यांनी राज्यपालांना एक पत्रं लिहून राजभवनातील मशीद नमाज पठणासाठी सुरु करण्याची विनंती केली होती. राजभवनातील कर्मचारी राजभवनातील मशिदीत सामान्य लोकांना नमाज पठणासाठी येऊ देत नाही. आता धार्मिकस्थळं उघडी करण्यात आल्याने या सर्वसामान्य जनतेला नमाज पठणाची परवानगी देण्यात यावी, अशी विनंती या पत्रात करण्यात आली होती. त्यावरून वाद निर्माण झाला होता. राजभवनात मुस्लिमांसाठी मशीद वा जागा दिली जात असेल, तर शासन सर्वधर्मसमभाव मानणारे असल्यामुळे राजभवनात हिंदूंनाही उपासना, आरती, पूजा आणि उत्सव साजरे करण्यासाठी मोठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी आज हिंदु जनजागृती समितीने एका पत्राद्वारे राज्यपालांकडे केली होती. त्यामुळे वाद निर्माण झाला होता.
स्वीडिश कार्टुनिस्ट लार्स विक्स यांचा मृत्यू झाल्यानंतर रझा अकादमीने 5 मे 2021 रोजी त्यांच्या मृत्यूचं सेलिब्रेशन केलं होतं. लार्स यांनी हजर मोहम्मद पैगंबरांचं कार्टुन काढलं होतं. त्यामुळे ते चर्चेत आले होते. त्यामुळे ते कट्टरतावाद्यांच्या निशाण्यावर आले होते. त्यांच्या जीविताला धोका निर्माण झाल्याने स्वीडिश सरकारने 2007 पासून लार्स यांना सुरक्षा पुरवली होती. ऑक्टोबर 2021मध्ये एका अपघातात त्यांचा मृत्यू झाल्यानंतर रझा अकादमीने मुंबईत त्यांच्या मृत्यूचं सेलिब्रेशन केलं होतं. लार्स यांचा मृत्यू झाल्याच आम्हाला आनंद होत आहे. पैगंबरांचं कार्टुन काढल्यानंतर अज्ञात इसमांनी त्यांच्यावर दोनदा हल्ला केला होता. 2010मध्ये त्यांच्या घराला आगही लावण्यात आली होती. पण त्यावेळी ते घरात नव्हते. त्यानंतर 2015मध्ये डेन्मार्कमध्ये एका पार्टीत त्यांच्यावर गोळीबारही करण्यात आला होता. पण त्यावेळीही ते बचावले होते, असं रझा अकादमीचे सईद नुरी यांनी सांगितलं होतं.
त्रिपुरात झालेल्या हिंसेचे महाराष्ट्रातही तीव्र पडसाद उमटले. काल रझा अकादमीने भिवंडीत कडकडीत बंद पुकारला. तर नांदेडमध्ये मोठी रॅली काढली. भिवंडीत मुस्लिम तरुणांनी आणि कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून या घटनेचा निषेध नोंदवला. बघता बघता शेकडो मुस्लिम तरुण एकवटले. त्यानंतर या तरुणांनी मोहल्या मोहल्यातून बाईक रॅली काढून घटनेचा निषेध नोंदवला. ही रॅली सुरू असतानाच शहरातील सर्व दुकाने बंद केली. त्यामुळे शहरात अत्यंत शुकशुकाट पसरला होता. सार्वजनिक आणि खासगी वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे अचानक वाहतूक व्यवस्था बंद झाल्याने अनेक प्रवाशांची गैरसोय झाली होती. अनेक तरुण रस्त्यावर, गल्लोगल्लीत फिरून दुकाने बंद करताना दिसत होती. नांदेडमध्येही बंद पुकारण्यात आला होता. काही कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून दुकाने बंद करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दुकानदार आणि मुस्लिम तरुणांमध्ये बाचाबाची झाल्याचं वृत्त आहे. नांदेडमध्ये काही ठिकाणी तोडफोड आणि दगडफेक झाल्याचं वृत्त आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांना या घटनेचा निषेध नोंदवणारं निवेदन देण्यासाठी मुस्लिम समाजाचा जमाव निघालेला असताना दगडफेक झाली. त्यामुळे पोलिसांनी जमावावर लाठीमार केल्याने वातावरण तणावपूर्ण झालं होतं.
संबंधित बातम्या:
अमरावतीत 144 कलम लागू, जमावानं टपरी जाळली, पोलिसांकडून अश्रूधूराचा वापर