नितेश राणेंच्या अटकेच्या चर्चांवरुन नारायण राणेंनी आज पुन्हा ठाकरे सरकारवर टीकेच्या फैरी झाडल्या. उपमुख्यमंत्री अजित पवारांपासून ते शिवसेना नेत्यांपर्यंत सगळ्यांवर राणेंनी टीका केली. विशेष म्हणजे ज्या दिवशी नारायण राणेंच्या अटकेची चर्चा होती. त्यादिवशी राणेंच्या बोलण्यात जो आक्रमकपणा होता, तोच आक्रमकपणा मुलगा आणि आमदार नितेश राणेंच्या अटकेच्या चर्चेंवेळीही दिसून आला. एका मारहाणीच्या प्रकाराबद्दल पोलिसांची तयारी, पाठवलेली पथकं यावरुनही नारायण राणेंनी सरकारला प्रश्न केले. सिंधुदुर्गात जणू एखादा दहशतवादी शिरला आहे की काय, अशी शंका व्यक्त करत राणेंनी सरकारला टोला मारला.
आवज काढलेला ठाकरेंना का झोंबला?
नितेश राणेंनी काढलेल्या मांजरीच्या आवाजवरही राणेंनी आपलं मत मांडलं. मांजरीचा आवाज काढणं आदित्य ठाकरेंना का लागलं? असा खोचक प्रश्न राणेंनी केलाय. नितेश राणेंबद्दल बोलून झाल्यावर राणेंनी आपला मोर्चा अजित पवार, भास्कर जाधव आणि शिवसेनेचे आमदार सुनील प्रभूंकडे वळवला. कोण अजित पवार इथंपासून ते भास्कर जाधवांच्या नक्कलेपर्यंत सर्व मुद्द्यावरुन राणेंनी आक्रमक उत्तरं दिली. इकडे सभागृहात आज टीकेवेळी आमदारांनी जरा जपून बोलावं, यावर सर्वांचं एकमत झालं. मात्र नितेश राणेंची टीका ही सभागृहाच्या बाहेर होती, तरी त्यावरुन इतकं रान का पेटवलं जातंय, याकडे नारायण राणे लक्ष वेधत होते.
पुन्हा राणे विरुद्ध शिवसेना संघर्षाची सुरुवात
मात्र यानिमित्तानं पुन्हा राणे विरुद्ध शिवसेना संघर्षाची सुरुवात झालीय. भास्कर जाधव, सुनिल प्रभू, दीपक केसरकर, आणि नितेश राणे वादात ज्यांची नावं अग्रभागी आहेत, ती सर्व मंडळी सुद्धा योगायोगानं कोकणातलीच आहेत. मात्र एखाद्या खून-खटल्यातही लवकर दाद न घेणारं पोलीस खातं, सिंधुदुर्गातल्या एका मारहाणीच्या आरोपात आमदाराच्या मागावर 3-3 पोलीस पथकं पाठवते. त्या पथकामध्ये 12 वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेशही असतो. यावरही आश्चर्य व्यक्त होतंय.