मुंबई : सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत (Sindhudurga District Bank Election) भाजप आणि पर्यायानं राणे पिता-पुत्रांनी महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) जोरदार झटका दिला. जिल्हा बँकेची निवडणूक जिंकताच कोकणासह मुंबईत भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. नारायण राणेंनीही (Narayan Rane) आता पुढचं लक्ष्य राज्य सरकार असं सांगत, आता भाजपचा मुख्यमंत्री विराजमान होणार असल्याचा दावाही केला. राणेंच्या याच वक्तव्यावरुन आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक (Nawab Malik) आणि शिवसेनेचे शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी राणेंना जोरदार प्रत्युत्तर दिलंय.
नारायण राणे आणि भाजपाने काही जिल्हा परिषदेची निवडणूक जिंकलेली नाही. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत 25 मते 50 मते असतात. आता अपहरण करणे, पैसे देणे आणि त्याच्यातून एखादी बँक जिंकल्यानंतर आाता ते राज्य जिंकण्याचं आव्हान देताहेत. हे म्हणजे गल्ली क्रिकेटमध्ये जिंकल्यानंतर वर्ल्डकप जिंकणार असं बोलण्यासारखं आहे, असा चोला मलिक यांनी राणेंना लगावलाय.
तर नारळावरची कुस्ती जिंकून हिंद केसरीची बरोबरी नारायण राणे करु शकत नाहीत. जिल्हा बँकेच्या निवडणुका या मर्यादित मतांच्या निवडणुका आहेत. जनमताचा कौल घ्यायला पुढे या म्हणजे तुम्हाला कोकणातील शिवसेना काय आहे हे कळेल, असा इशाराच शंभूराज देसाई यांनी राणेंना दिलाय. त्याचबरोबर नारायण राणे हे बत्ताशावरचे पैलवान आहेत. ते हिंद केसरीची बरोबरी करु शकत नाहीत, अशी टीका देसाई यांनी केलीय.
राणे विरुद्ध महाविकास आघाडी असा शाब्दिक सामना रंगलेला असताना दुसरीकडे पोस्टरवॉरही जोरात सुरु आहे. आधी नितेश राणे यांचे हरवले आहेत, माहिती देणाऱ्याला कोंबडी बक्षीस देण्यात येईल, अशा आशयाचे पोस्टर मुंबईत लागले होते. त्याला उत्तर देताना, नितेश राणेंनी फेसबूकवरुन एक पोस्टर पोस्ट केलं. त्यावर गाडलाच असं शिर्षक देऊन, शिवसेना नेते सतीश सावंत यांचा फोटोवर ते उभे असल्याचं दाखवण्यात आलं आहे. आता सोशल मीडियावर नारायण राणेंचं पोस्टर व्हायरल होत आहे. यातून शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न झालाय. राणेंच्या हातात वाघाच्या शेपूट असून, त्या वाघाला राणेंनी जिल्हा बँकेत जाण्यापासून रोखलं, असं दाखवण्यात आलं आहे.
इतर बातम्या :