मुंबई : सलग 2 दिवसांत केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये खटके उडाल्याचं पाहायला मिळत आहे. सीताराम कुंटेंना (Sitaram Kunte) मुख्य सचिवपदी 3 महिन्यांची मुदतवाढ देण्याची विनंती उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) मोदींना केली होती. मात्र मोदींनी ही मागणी अमान्य करत कुंटेंना मुख्य सचिव पदासाठी मुदत वाढ देण्यास नकार दिला. त्यामुळं देबाशिष चक्रवर्तींची (Debashish Chakraborty) मुख्य सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. आता ओमिक्रॉन व्हेरियंटवरुन खबरदारी म्हणून परदेशातून येणाऱ्या आणि राज्यांतर्गत विमानप्रवासासाठी जी नियमावली जारी केलीय, त्यावरुनही केंद्रानं आक्षेप घेतलाय. तसंच केंद्राच्या सूचनांचं पालन करण्याबाबतचं पत्रच केंद्राकडून राज्याला पाठवण्यात आलं आहे.
>> परदेशातून येणाऱ्यांना RT-PCR टेस्ट बंधनकारक आहे
>> परदेशातून आलेल्या प्रवाशांची टेस्ट निगेटिव्ह आली तरी 14 दिवस होम क्वारंटाईन व्हावं लागणार
>> ओमिक्रॉनचं संक्रमन नसलेल्या देशातून आलेल्या प्रवाशांचीही विमानतळावर कोरोना टेस्ट होईल
>> राज्यांतर्गत विमान प्रवासासाठीही लसीचे दोन्ही डोस गरजेचे किंवा अन्यथा गेल्या 48 तासांतील RTPCR टेस्ट निगेटिव्ह हवी
राज्य सरकारच्या याच नियमावलीवर केंद्राच्या आरोग्य सचिवांनी पत्र लिहून आक्षेप घेतला आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी म्हटलंय की, महाराष्ट्र सरकारनं केंद्राच्या मार्गदर्शक सूचना जारी कराव्यात आणि सुधारीत नियम लागू करावेत. महाराष्ट्राच्या मार्गदर्शक सूचना इतर राज्याच्या गाईडलाईन्सशी जुळत नसल्याचा केंद्राच्या पत्रात उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळं राज्य सरकार आता नियमावलीवर पुनर्विचार करणार का हे पाहावं लागणार आहे.
देशात अजून ओमिक्रॉन व्हेरियंटचा रुग्ण आढळलेला नाही. मात्र महाराष्ट्रात दक्षिण आफ्रेकेसह इतर देशातून आलेल्या 6 प्रवाशांची RT-PCR टेस्ट पॉझिटिव्ह आलीय. पण या प्रवाशांना ओमिक्रॉन विषाणूची लागण झाली का ? हे 7 दिवसांनी अहवाल आल्यावरच कळेल. 6 कोरोनाबाधित प्रवाशांपैकी पिंपरी-चिंचवडमध्ये 2 जण आहेत. तर मुंबई, डोंबिवली, मीरा भाईंदर आणि पुण्यात प्रत्येकी एक रुग्ण आहे.
ओमिक्रॉन व्हेरियंट एकूण 21 देशांमध्ये पसरलाय. त्यामुळं सध्याच्या लसी प्रभावी आहेत का ? आणि बुस्टर डोस व्हावं लागणार का ? अशी चर्चा सुरु झालीय. त्यावर सीरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावालांनीही भाष्य केलंय. ‘ओमायक्रॉन विषाणू किती घातक आहे किंवा नाही हे आताच सांगता येणार नाही. ओमिक्रॉन व्हेरियंटविरोधात कोव्हिशील्ड किती प्रभावी आहे, हे येत्या दोन ते तीन आठवड्यांमध्ये समजेल. काळानुसार कोव्हिशील्डचा प्रभाव कमी होईल हे आवश्यक नाही. प्रथम सर्वांना कोरोना प्रतिबंधात्मक लसीचे दोन्ही डोस देणं आवश्यक आहे. त्यानंतरच इम्युनिटी वाढवण्यासाठी बूस्टर डोसचा विचार केला जाऊ शकतो. जर सरकारनं बूस्टर डोस देण्याचा निर्णय घेतला तर आम्ही लसीचा पुरवठा करण्यासाठी तयार आहोत, असं पुनावाला म्हणाले.
इतर बातम्या :