मुंबई : एखादा सांस्कृतिक वाद असो, ऐतिहासिक असो वा राजकीय, बहुतांश राजकीय पक्षांचे बिणीचे शिलेदार त्यावर जहाल मतं मांडतात. मात्र त्यांच्या पक्षांचे प्रमुख त्याच मुद्द्यांवर नेहमी मवाळ राहतात. म्हणजे इतिहासावरच्या वादाबद्दल जे जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad), अमोल कोल्हे आणि अमोल मिटकरी बोलतात, ते शरद पवार (Sharad Pawar) कधीच बोलत नाहीत. दुसरीकडे राजकीय आरोपांवर नारायण राणे (Narayan Rane), किरीट सोमय्या, गोपीचंद पडळकर जे बोलतात, ते स्वतः देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) कधीच बोलत नाहीत. तर ज्याप्रमाणे शिवसेनेचे संजय राऊत भाजपविरोधात टीकेच्या तलवारी उपसतात, त्यातुलनेत राजकीय सभा सोडल्या तर उद्धव ठाकरेंचा वार जरा हलक्या हातानं होतो.
हा प्रश्न पडण्याचं कारण म्हणजे संपादक गिरीश कुबेरांच्या पुस्तकावरुन झालेला वाद आणि त्यांच्या पुस्तकात छत्रपती संभाजींराजेबद्दल केलेलं लिखाण. ज्या पुस्तकावरुन वाद झाला, त्याच पुस्तकाबद्दल सुप्रिया सुळेंनी काही महिन्यांपूर्वी एक पोस्ट केली होती. त्यावर लिहिलं होतं की, reading intresting book by girish kuber… म्हणजे गिरीश कुबेर लिखीत एका रंजक पुस्तकाचं सध्या वाचन सुरुय. सुप्रिया सुळे यांची ही पोस्ट 21 मे 2021 ची आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक पत्र लिहिलं होतं. ज्यात मिटकरींनी गिरीश कुबेरांच्या त्याच पुस्तकावर बंदीची मागणी केली होती. मिटकरींनी हे पत्र 28 मे 2021 ला लिहिलं होतं.
Reading this interesting book by @girishkuber. pic.twitter.com/XJGtc30XTH
— Supriya Sule (@supriya_sule) May 21, 2021
छत्रपती शिवाजी महाराजांची बाजीराव पेशव्या सोबत तुलना करून कुबेराना नेमकं काय साध्य करायचं आहे? पुस्तकावर आक्षेप आले की प्रसिद्धी व खपाची विक्री वाढून अमाप पैसा हाच उद्देश लेखकांचा असेल तर हे गंभीर आहे.या पुस्तकाची शहानिशा करून कार्यवाही व्हावी@CMOMaharashtra@Dwalsepatil pic.twitter.com/Cuvxj2IQsm
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) May 23, 2021
म्हणजे सुप्रिया सुळे म्हणतायत की गिरीश कुबेरांचं पुस्तक इंट्रेस्टिंग आहे आणि अमोल मिटकरी म्हणतायत की कुबेरांच्या पुस्तकातले संदर्भ खोटे आहेत. जेव्हा बाबासाहेब पुरंदरेंना महाराष्ट्र भूषण देण्यावरुन वाद झाला, तेव्हा जितेंद्र आव्हाडांनी त्याविरोधात संघर्ष यात्रा काढली. मात्र राष्ट्रवादीनं आव्हाडांची ही वैयक्तिक भूमिका असल्याचं सांगून पुरस्काराला फाजील महत्व देण्याचं कारण नसल्याचं म्हटलं होतं.
जेव्हा उद्धव ठाकरेंनी बंगल्याचा घोटाळा केल्याचा आरोप किरीट सोमय्या करतात, तेव्हा भाजप नेते फक्त सोमय्यांच्या आरोपांची पाठराखण करतात, पण सोमय्यांनी केलेले आरोप कधीच जसेच्या-तसे स्वतःच्या तोंडून बोलत नाहीत. नारायण राणे आणि गोपीचंद पडळकरांबाबतही असंच घडतं. आमच्या अस्मितांना डिवचाल, तर अंगावर येऊ, जसास तसं उत्तर देऊ, असं स्वतः संजय राऊत म्हणतात. मात्र जेव्हा कुबेरांवर शाईफेक होते, तेव्हा राऊत अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कारही करतात.
मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर असे कृत्य मला मान्य नाही. मराठी भाषेचा उत्सव सुरू असताना मराठी वृत्तपत्राच्या संपादकावर हल्ला करणे याचा निषेध. हा निषेध ज्याला मराठी भाषा-साहित्य-संस्कृतीबद्दल अभिमान आहे त्या प्रत्येकाने करायला हवा. – @rautsanjay61 jihttps://t.co/afNfBQu22t
— Anagha Acharya – अनघा आचार्य (@AnaghaAcharya) December 5, 2021
थोडक्यात पहेलवान आणि विद्वान या दोन्ही गटातली माणसं प्रत्येक पक्षात असावी लागतात. कारण, विद्वान जे बोलू शकत नाही, ते पहेलवान शड्डू ठोकून बोलू शकतो. बाकी नागपूर, अमरावती महापालिकेच्या निवडणुका जवळ आल्या की दंगली होतात आणि पुण्याची महापालिका टप्प्यात आली, की मराठा-पेशव्यांच्या इतिहासावर वाद रंगतात, हा निव्वळ योगायोग असतो.
इतर बातम्या :