मुंबई: राज्यातील राज्यसभेच्या (Rajya Sabha Election) सहा जागांसाठी येत्या 10 जून रोजी निवडणूक होणार आहे. त्यामुळे या सहाही जागांकडून शिवसेना (shivsena), भाजप (bjp), काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून कोण उभं राहणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. स्वराज्य पक्षाचे नेते संभाजी छत्रपती यांनी या निवडणुकीत उडी घेतल्याने ही निवडणूक अधिक रंजक झाली आहे. त्यामुळे शिवसेना संभाजीराजेंना पाठिंबा देणार की आपला उमेदवार मैदानात उतरवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर, काँग्रेसकडून ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांचा पत्ता कट केला जाणार आहे. मात्र, नवा उमेदवार कोण असेल यावर काँग्रेसने सस्पेन्स ठेवला आहे. परंतु, काँग्रेस यावेळी राज्यसभेवर महाराष्ट्रातील नेत्यालाच संधी देणार असल्याचं सांगितलं जात आहे. येत्या एक दोन दिवसात या राज्यसभेच्या उमेदवारांची नावं अधिकृतरित्या जाहीर होणार असल्याने त्याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधलं गेलं आहे.
भाजपमधून केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, खासदार विनय सहस्त्रबुद्धे आणि विकास महात्मे हे तीन सदस्य राज्यसभेतून निवृत्त झाले आहेत. मात्र, भाजपच्या वाट्याला राज्यसभेच्या दोनच जागा येत आहेत. दोन जागा निवडून दिल्यावर भाजपकडे अतिरिक्त मते उरतात. पण त्यातून उमेदवार निवडून येणं शक्य नाही. त्यामुळे भाजप दोनच जागांवर आपले अधिकृत उमेदवार देणार आहे. भाजपकडून पीयूष गोयल यांना राज्यसभेवर पाठवलं जाणार आहे. गोयल हे केंद्रात मंत्री आहेत. त्यामुळे त्यांनाच पुन्हा संधी दिली जाणार आहे. तर विनय सहस्त्रबुद्धे हे संघाशी संबंधित आहेत. संघ आणि भाजपचा बुद्धिजीवी चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. शिवाय केंद्राच्या अनेक आंतरराष्ट्रीय समित्यांवर ते कार्यरत आहे. पक्षालाही त्यांची गरज आहे. त्यामुळे सहस्त्रबुद्धे यांना संधी दिली जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
भाजपकडे अतिरिक्त मते शिल्लक उरतात. पण तिसरा उमेदवार निवडून आणला जाईल एवढी मते उरत नाहीत. त्यामुळे भाजपकडून तिसऱ्या जागेवर उमेदवार दिला जाण्याची शक्यता कमी असल्याचं सांगितलं जात आहे. भाजपचा राज्यसभा निवडणुकीत पराभव झाला हा मेसेज पालिका निवडणुकांच्या तोंडावर जाऊ नये म्हणून भाजपकडून उमेदवार न देण्याचं घटत आहे. त्यामुळे विकास महात्मे यांना राज्यसभेची संधी दिली जाण्याची शक्यता कमी आहे. मात्र, स्वराज्य पक्षाचे नेते संभाजी छत्रपती हे अपक्ष म्हणून लढल्यास भाजप त्यांना तिसऱ्या जागेसाठी पाठिंबा देऊ शकतो, असं ज्येष्ठ राजकीय विश्लेषक विवेक भावसार यांनी सांगितलं.
राष्ट्रवादीच्या वाट्याला राज्यसभेची एकच जागा येते. जिंकून येणारी ही जागा आहे. प्रफुल्ल पटेल निवृत्त झाल्याने ही जागा रिक्त झाली आहे. त्यामुळे पटेल यांनाच राष्ट्रवादीकडून पुन्हा संधी दिली जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली.
शिवसेनेचे संजय राऊत हे सुद्धा राज्यसभतून राज्यसभेतून निवृत्त झाले आहेत. त्यामुळे त्यांना पुन्हा राज्यसभेवर संधी दिली जाणार आहे. राऊत यांची ही राज्यसभेची तिसरी टर्म आहे. त्यांना उमेदवारी देऊ नये अशी पक्षातील एका गटाचं म्हणणं होतं. मात्र, राऊत हे भाजपला अंगावर घेतात. भाजपला पुरून उरत असल्याने त्यांचं राज्यसभेत असणं पक्षप्रमुखांना महत्त्वाचं वाटत असल्याने त्यांना पुन्हा एकदा संधी दिली जाणार आहे. शिवसेनेच्या वाट्याला आणखी एक जागा येत आहे. त्यांना या जागेसाठी मते कमी पडत असली तरी राष्ट्रवादीच्या मतांनी ही उणीव भरून निघणार आहे. 2020च्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून शरद पवार आणि फौजिया खान राज्यसभेसाठी उभे होते. त्यावेळी शिवसेनेने राष्ट्रवादीला अतिरिक्त मते देऊन मदत केली होती. त्यामुळे आता राष्ट्रवादीकडून त्यांची अतिरिक्त मते शिवसेनेला दिली जाणार आहेत.
या पार्श्वभूमीवर संभाजी छत्रपती हे शिवसेनेत न आल्यास शिवसेनेकडून कोल्हापूरचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. शिवसेनेला राज्यसभेत आपलं संख्याबळ वाढवायचं आहे. त्यामुळे त्यांना शिवसेनेचा अधिकृत उमेदवार हवा आहे. म्हणूनच अपक्ष उमेदवाराला पाठिंबा न देण्याचा शिवसेनेने निर्णय घेतला आहे. युतीच्या सरकारमध्ये असताना कोल्हापुरातून शिवसेनेचे सहा आमदार निवडून आले होते. पण कोल्हापुराला शिवसेनेने मंत्रिपद दिलं नव्हतं. त्याचा फटका 2019च्या निवडणुकीत शिवसेनेला बसला. शिवसेनेचा फक्त एकच उमेदवार निवडून आला होता. त्यामुळे शिवसेनेने कोल्हापूर राखण्यासाठी राजेश क्षीरसागर यांना महामंडळ दिलं. कोल्हापुरातून शिवसेनेचा एक खासदार निवडून आलेला आहे. पण संजय पवार यांना राज्यसभेवर पाठवून गेल्यावेळची उणीव भरून काढण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. त्यामुळे यावेळी कोल्हापुरातूनच शिवसेना उमेदवारी देणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
काँग्रेसच्या वाट्याला राज्यसभेची एक जागा आली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम हे निवृत्त झाल्याने ही जागा रिक्त झाले आहेत. चिदंबरम हे मागच्यावेळी महाराष्ट्रातून राज्यसभेवर गेले होते. मात्र, गेल्या सहा वर्षात ते एकदाही महाराष्ट्रात फिरकले नाही. बैठका घेतल्या नाही. पक्षाच्या नेत्यांना भेटले नाहीत. त्यामुळे त्यांच्या नावाला काँग्रेसमधून विरोध आहे. शिवाय त्यांच्या मागे तपास यंत्रणांचा ससेमिराही लागला आहे. त्यामुळे चिदंबरम यांचा पत्ता कट केला जाणार आहे. अविनाश पांडे, मुकुल वासनिक हे पडलेले उमेदवार आहेत. त्यामुळे त्यांना उमेदवारी दिली जाणार नाही. मोहन जोशी आणि मुझफ्फर हुसैन यांनाही तिकीट दिलं जाणार नाही. काँग्रेसचं उदयपूर येथे चिंतन शिबीर पार पडलं. यावेळी तरुणांना संधी देण्याचं ठरल्याने काँग्रेसच्या राज्यसभेच्या उमेदवारीत चिंतन शिबीराचा प्रभाव पडण्याची चिन्हे आहेत. काँग्रेसकडून राज्यसभेसाठी सरप्राईज दिलं जाईल, असं सांगितलं जात आहे.