महाराष्ट्रातील सर्वाधिक रुग्ण संख्या असलेलं शहर म्हणजे मुंबई! सध्या मुंबईतही नव्या रुग्णसंख्येचा 10 हजारांचा टप्पा पार झालाय. तर ज्या दिवशी 20 हजार रुग्ण संख्या होईल, तेव्हा मुंबईत लॉकडाऊन होणार, असं मुंबई महापालिकेच्या आयुक्तांनी स्पष्ट केलंय. येत्या काही तासांतच मुंबईत नेमका काय निर्णय होतो, हे स्पष्ट होणार आहे.
देशभरातून सर्वाधिक कोरोनाचे नवे रुग्ण महाराष्ट्रात! आणि महाराष्ट्रातून सर्वाधिक रुग्ण हे मुंबईत आढळतायत. त्यामुळं मुंबई महापालिकेच्या आयुक्तांनी लॉकडाऊनवर थेट भाष्य केलंय. रोज 20 हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळल्यास मुंबईत लॉकडाऊन लागणार असं आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी म्हटलंय.
मुंबई महापालिका क्षेत्रात ज्या दिवशी रोज 20 हजारांहून अधिक कोरोनाचे रुग्ण आढळतील. त्या दिवशी तात्काळ मुंबईत लॉकडाऊन लागेल. मुंबईत संसर्गाचा दर वाढतोय, त्यामुळं रुग्ण वाढीची एका मर्यादा पार झाली तर लॉकडाऊन शिवाय पर्याय राहणार नाही. मुंबईतला कोरोनाच्या संसर्गाचा वेग हा 17 % आहे.
1 जानेवारीला मुंबईत 6 हजार 347 नवे रुग्ण आढळले. 2 जानेवारीला पुन्हा रुग्ण संख्येत वाढ होऊन 8 हजार 63 रुग्णांची नोंद झाली. 3 जानेवारीला 8 हजार 82 रुग्ण आढळलेत. दरम्यान, यानंतर मुंबईच्या महापौरांनी लॉकडाऊनबाबत सूचक विधान केलंय. लॉकडाऊनसाठीची नेमका काय निकष लावला जाणार, हे किशोर पेडणेकरांनी स्पष्ट केलंय. 20 हजार रुग्ण ज्या दिवशी दिवसाला आढळतील, त्यादिवशी मुंबईला पुन्हा टाळं लावावं लागेल, असा इशाराच त्यांनी दिलाय.
त्यातच आता मुंबईसाठी, महापालिकेनं नवी नियमावली जारी केलीय..त्यानुसार, इमारतीच्या एकूण क्षमतेपैकी 20% रहिवासी कोरोनाबाधित आढळून आल्यास संपूर्ण इमारत किंवा विंग सिल केली जाईल. विलगीकरण आणि होम क्वारंटाईन असलेल्या रुग्णांनी कोरोना नियमांचे काटेकोर पालन करणं गरजेचं आहे. रुग्णांना लक्षणं दिसून आल्यास किमान 10 दिवस विलगीकरणात राहणं बंधनकारक आहे. इमारतीत कोरोना रुग्ण आणि त्या कुटुंबाला अन्न, औषध तसंच दैनंदिन गरजेच्या वस्तूंचा पाठपुरावा केला जाईल याची काळजी सोयायटीच्या समितीनं घ्यावी.
महापालिका आयुक्त असो की महापौर किशोरी पेडणेकर, यांनी लॉकडाऊनचे संकेत दिलेत. तर दुसरीकडे मुंबईतली गर्दी काही कमी होताना दिसत नाही. बाजारपेठा असो की भाजी मार्केट गर्दी कमी होताना दिसत नाही. गर्दी टाळली, नियम पाळले, तर लॉकडाऊन होणार नाही, असंही महापौरांनी म्हटलं होतच. पण दुर्दैवानं ना गर्दी कमी होत आहे. ना नियम पाळले जात आहेत.
संपूर्ण देशात सोमवारी 37 हजारांहून अधिक रुग्ण आढळलेत. त्यापैकी एकट्या महाराष्ट्रातच 12 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाली. म्हणजेच देशाच्या 32 % रुग्ण महाराष्ट्रात आढळतायत. त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रासाठीच निर्बंधांसंदर्भातले निर्णय लवकरच घेतले जाऊ शकतात. पुढच्या काही तासांत हे निर्णय काय असतील, हे स्पष्ट होणार आहे. केंद्रानं सरकारी कर्मचाऱ्यांना 50 टक्के उपस्थिती सांगितली आहे. तसाच निर्णय आता महाराष्ट्र सरकारही घेण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी तसे थेट संकेत पुण्यात बोलताना दिले आहेत. अर्थात राज्यात संपूर्ण लॉकडाऊन नसेलच, असं म्हणत विजय वडेट्टीवारांनी निर्बंध कडक होती, असंही म्हटलंय.
पश्चिम बंगाल आणि हरियाणात मिनीलॉकडाऊन लावण्यात आलाय. इथं शाळा, कॉलेज, उद्यानं बंद करण्यात आलेत. तर दिल्लीतही शनिवारी, रविवारी कर्फ्यूची घोषणा करण्यात आलीय..म्हणजे अत्यावश्यक सेवा वगळता शनिवारी आणि रविवारी दिल्ली बंद असेल. त्यातच महाराष्ट्रातला संसर्गाचा वेग पाहता, लवकरच महाराष्ट्रातही निर्बंध येऊ शकतात. हे निर्बंध नेमके काय असणार, हे पुढत्या काही तासांत स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
Ajit Pawar | कोरोनाची परिस्थिती बिकट होत आहे, लोकांना विनंती आहे कठोर निर्णय घ्यायला लावू नका – पवार
Shardul Thakur: शार्दुल लोकप्रिय, यशस्वी का? ट्रेन करणाऱ्या कोचने सांगितलं त्यामागचं कारण…