मुंबई : एसट्या संपावर आहेत आणि सध्या बहुतांश महाराष्ट्र वडाप गाड्यांवर धावतोय. लगीनसराई सुरु झालीय, शाळा-कॉलेज पुन्हा भरु लागलेयत. पण सध्या लोकांना कालीपिली नाहीतर वडाप गाड्यांचाच आधार आहे. खासगी गाड्या सीटं भरल्याशिवाय निघत नाही, त्यामुळे लोकांना तासभर आधीच घराबाहेर पडावं लागतंय. मालेगाव ते नाशिकचं अंतर 120 किलोमीटर आहे. या अंतरासाठी एसटी एका बाजूनं 145 रुपये भाडं आकारत होती. मात्र आता त्याच प्रवासासाठी खासगी चालकांना दोन्हीकडच्या प्रवासासाठी 500 रुपये द्यावे लागतायत. रोज प्रवाशांनी महिन्याला पंधरा हजार कुठून? आणायचे असा सावाल आहे.
एसटी बंद असल्यानं प्रवाशांचे प्रचंड हाल
नोकरदार, विद्यार्थ्यी, आजारपणासाठी तक्रारींमुळे प्रवास करणारे ज्येष्ठ नागरिक, शेतकामासाठी तालुक्यावर जाणारा शेतकरी, कोर्च-कचेरीच्या तारखांना जाणारे, खेड्यांवर भाजीपाला नेणारे या सर्व लोकांचे हाल प्रचंड मोठे आहेत. एसटी संपाचा ताण साऱ्या ग्रामीण महाराष्ट्रावर पडतोय. आणि दुसरीकडे एसटी महामंडळाच्या तोट्याचा आकडा संपाच्या तारखेगणिक वाढत चाललाय.
संपामुळे एसटी महामंडळाचेही मोठे नुकासान
संपामुळे आतापर्यंत एसटीचं 440 कोटी रुपयांचं उत्नन्न बुडालंय. संपाआधी रोज 65 लाख लोक एसटीनं प्रवास करत होते. सध्या फक्त जेमतेम 1 लाख लोक एसटीनं प्रवास करत आहेत. दिवाळीचा सण तर संपातच गेला, आणि आता लग्नाचा अर्धा सिझनही निघून गेलाय. राज्यातल्या 250 आगारांपैकी फक्त 123 आगार सुरु झाले आहेत. आणि फक्त 19 हजार 995 कर्मचारी कामावर परतलेत. बाकी 72 हजार 271 कर्मचारी अजूनही संपावरच आहेत. लोकांच्या होणाऱ्या फजितीवर सरकारही काही बोलत नाहीय आणि दुसरीकडे जो संप एसटी कर्मचारी आणि एसटीला जगवण्यासाठी सुरुय, नेमका तोच संप आता एसटीला रोज तोट्याच्या खाईत लोटत चाललाय.