मुंबई: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव तेजस ठाकरे सक्रिय राजकारणात येणार आहेत. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी तसं सुतोवाच केलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे शिवसेनेची कमान आदित्य आणि तेजस यांच्याकडे सोपवणार असल्याची चर्चाही जोर धरत आहे. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे संयमी नेते आहेत. तर तेजस आक्रमक आहेत. त्यामुळे तेजस राजकारणात आल्यास शिवसेनेला ठाकरे घराण्यातून आणखी एक आक्रमक नेतृत्व मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवसेनेचा हा नवा दारुगोळा किती स्फोटक असेल? यावर टाकलेला हा प्रकाश…. (Tejas Uddhav Thackeray soon to enter politics?; read inside story)
ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक प्रकाश अकोलकर यांनी तेजस ठाकरे यांच्या शिवसेना प्रवेशाने शिवसेनेला काहीच फायदा होणार नसल्याचं स्पष्ट केलं. तेजस यांनी राजकारणात जरुर यावं. पण कार्यकर्ता म्हणून यावं. तेजस ठाकरे शिवसेनेत आल्यावर शिवसेनेला काहीच फायदा होणार नाही हे तितकच खरं आहे, असं सांगतानाच घराणेशाही हा मोठा शाप आहे. ऐकेकाळी बाळासाहेबांनी काँग्रेसची संभावना संजय गांधी आणि कंपनी अशी केली होती. इंदिरा गांधींना प्रचंड विरोध केला होता. घराणेशाहीच्या मुद्द्यावरच विरोध केला होता ना? मग तुम्ही काय करत आहात? घरातल्या घरात पदांचं वाटप करून तरुण पिढीला आकर्षित करता येईल असं मला काही वाटत नाही. सध्या सत्ता आहे म्हणून लोकं सोबत राहतीलही. ते राग बोलून दाखवणारही नाही. पण हे बरोबर नाही. सत्तेचं इतक्या मोठ्या प्रमाणावर एका घराण्याने केंद्रीकरण करणं आणि गप्पा लोकशाहीच्या मारणं हे चूक आहे. एका घराण्यात सत्ता किती केंद्रीत करायची याचा हा अतिरेकी हव्यास आहे, असं ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्रकाश अकोलकर यांनी सांगितलं.
तरुण वर्गाला आकर्षित करायचं असेल तर संघटनेतील वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांना पुढे आणलं पाहिजे. शिवसेनेचं सरसरी वय 40 आहे. शिवसेना कधीच म्हातारी झाली नाही. पण तुम्ही या नेतृत्वाला कधीच पदं देणार नसाल. त्यांना कधीच वाव देणार नसाल आणि एका घराण्यातील तिसरा माणूस त्यांच्यावर लादणार असाल तर हे शिवसैनिकांचं मानसिक खच्चीकरण आहे. एका दिवसात घराण्यातून आलेल्याला लोकं कसं काय स्विकारतील?, असा सवालही अकोलकर यांनी केला.
महापालिका निवडणुकीत अजून एक ठाकरे प्रचारात फिरवण्याच्या दृष्टीने तेजस यांचा फायदा होईल. शिवाय तेजस यांना राजकीय महत्त्वकांक्षा आहेतच. ते निवडणूक लढवणार नाहीत. पण निवडणूक प्रचारात उतरतील. समोर अमित ठाकरे आहेत. त्यामुळे त्यांना प्रचारात सक्रिय केलं जाऊ शकतं. तेजस शिवसेनेत आल्याने शिवसेनेला फायदाही होणार नाही आणि नुकसानही होणार नाही. फार फार स्टार कँम्पेनर म्हणून त्यांचा प्रचारात उपयोग होईल. पण त्यामुळे मतात वाढ होईल असे नाही, असं राजकीय विश्लेषक अभय देशपांडे यांनी सांगितलं. तर राष्ट्रीय राजकारणात स्पेसच नाही किंवा भाजप स्पेसही ठेवणार नाही त्यामुळे उद्धव ठाकरे राष्ट्रीय राजकारणात जाण्याची शक्यता कमी आहे. उद्धव ठाकरे राज्याचं नेतृत्व करतील या अटीवरच काँग्रेस-राष्ट्रवादी सत्तेत सहभागी झाली आहे. तीही अडचण आहेच, असं देशपांडे यांनी स्पष्ट केलं.
उद्धव ठाकरे हे राजकारणात येणार हे कुणाला माहीत नव्हतं. त्यांनाही त्यांची कल्पना नव्हती. महाबळेश्वरच्या शिबिरात ठराव मांडला गेला. त्यात त्यांची कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती केली गेली. त्यावेळी बाळासाहेब ठाकरे अनुपस्थित होते. आदित्य ठाकरेंनी वरळीतून उमेदवारी अर्ज भरला. तेव्हा संजय राऊत यांनी आदित्य ठाकरेंकडेच मुख्यमंत्रीपद राहील अशा आशयाचं विधान केलं होतं. त्यासभेला उद्धव ठाकरेही उपस्थित नव्हते. ही पार्श्वभूमी समजून घेतली पाहिजे. आदित्यच्या रुपाने ठाकरे घराण्याची चौथी पिढी राजकारणात आहे. त्यामुळे तेजस ठाकरेही येऊ शकतात. सुशिक्षित तरुणांनी राजकारणात यावं हा हेतू आहे. त्यामागे काही गणित नाही. त्यांनी का राजकारणात येऊ नये?, असं ज्येष्ठ राजकीय पत्रकार आणि राजकीय विश्लेषक योगेश त्रिवेदी यांनी सांगितलं.
भयमुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त राजकारण करण्यासाठी तरुणांनी राजकारणात येण्याची गरज आहे. तरुणांनी राजकारणात मोठ्या संख्येने यायला हवं, त्या दृष्टीने नेतृत्व विचार करत असतं. तरुणांना राजकारणात आणण्याच्या हेतून तेजस यांना आणण्याचं शिवसेनेत घटत असावं. तसं होत असेल तर त्याचं स्वागतच केलं पाहिजे, असंही ते म्हणाले. तेजस ठाकरे हे आक्रमक आहेत. त्यामुळे त्याचा शिवसेनेला फायदाच होईल, असं त्रिवेदी यांनी सांगितलं. (Tejas Uddhav Thackeray soon to enter politics?; read inside story)
— Milind Narvekar (@NarvekarMilind_) August 7, 2021
संबंधित बातम्या:
तेजस ठाकरे म्हणजे ठाकरे कुटुंबाचे व्हिव्हियन रिचर्डस्; ‘या’ नेत्यानं केलं कौतुक
तेजस ठाकरे माझ्या डोक्याबाहेरचा विषय, जीवसृष्टी सोडून राजकारणात येईल असं वाटत नाही: भुजबळ
(Tejas Uddhav Thackeray soon to enter politics?; read inside story)