आघाडी सरकारच्या नाकीनऊ आणणारे सोमय्या भाजपमध्ये येण्यापूर्वी काय करायचे?, नीलम नगर ते संसद कसा होता प्रवास?

| Updated on: Feb 12, 2022 | 10:15 AM

राज्यात आघाडी सरकार आल्यापासून भाजपचे नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) चांगलेच चर्चेत आले आहेत. दर काही दिवसांनी आघाडी सरकारच्या मंत्री आणि नेत्यांचे घोटाळे बाहेर काढत असल्याने सोमय्या अधिकच चर्चेत आले आहेत.

आघाडी सरकारच्या नाकीनऊ आणणारे सोमय्या भाजपमध्ये येण्यापूर्वी काय करायचे?, नीलम नगर ते संसद कसा होता प्रवास?
आघाडी सरकारच्या नाकीनऊ आणणारे सोमय्या भाजपमध्ये येण्यापूर्वी काय करायचे?
Follow us on

मुंबई: राज्यात आघाडी सरकार आल्यापासून भाजपचे नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) चांगलेच चर्चेत आले आहेत. दर काही दिवसांनी आघाडी सरकारच्या मंत्री आणि नेत्यांचे घोटाळे बाहेर काढत असल्याने सोमय्या अधिकच चर्चेत आले आहेत. आरटीआयचा खुबीने वापर करून ते आघाडीच्या नेत्यांचे घोटाळे बाहेर काढत आहेत. एवढेच नव्हे तर थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray), त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावरही त्यांनी घोटाळ्याचे आरोप करून त्यांनी एकच खळबळ उडवून दिली. शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांना तर दापोलीतील आपल्याच बंगल्यावर हातोडा चालवावा लागला आहे. त्यामुळे सोमय्यांचा धसका किती आहे हे दिसून येते. शिवसेनेचे नेते संजय राऊत, खासदार भावना गवळी, आमदार रवींद्र वायकर, परिवहन मंत्री अनिल परब आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ हे सुद्धा सोमय्या यांच्या आरोपातून सुटू शकले नाहीत. सोमय्या यांच्याकडे ना खासदारकी आहे ना कोणतंही मंत्रीपद. तरीही ते आघाडी (mahavikas aghadi) सरकारला अंगावर घेण्याचं काम करत आहेत. सोमय्या नेमके कोण आहेत? त्यांची राजकीय वाटचाल कशी सुरू झाली? राजकारणात येण्यापूर्वी ते काय करत होते? सोमय्या यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या राजकीय प्रवासावर टाकलेला हा प्रकाशझोत.

सोमय्या कोण आहेत?

मुलुंडच्या नीलम नगरमध्ये राहणारे किरीट सोमय्या यांचा जन्म 12 फेब्रुवारी 1954 रोजी मुंबईत झाला. त्यांच्या वडिलांचे नाव जयंतीलाल तर आईचे नाव गुणवंती असे आहे. त्यांच्या पत्नीचं नाव डॉ. मेधा सोमय्या आहे. सोमय्या यांच्या मुलाचं नाव नील असून ते मुंबई महापालिकेतील नगरसेवक आहेत.

चार्टड अकाऊंटच्या परीक्षेत रँकिंगमध्ये

किरीट सोमय्या हे चार्टड अकाऊंटंट होते. चार्टड अकाऊंटंटच्या परीक्षेत ते देशात पहिल्या 50 जणांच्या यादीत आले होते. त्यानंतर त्यांनी मुंबई विद्यापीठातून ‘लघु उद्योग संरक्षण आणि वित्त’ विषयात डॉक्टरेट केली होती. राजकारणात येण्यापूर्वी चार्टड अकाऊंटंट म्हणून ते काम करत होते. त्यांनी मुंबई विद्यापीठ आणि दिल्लीच्या इन्स्टिट्यूट ऑफ चार्टड अकाऊंटंटमधून शिक्षण घेतलं आहे.

जयप्रकाश नारायण ते भाजप

मात्र, 1975 पासून म्हणजे विद्यार्थीदशेपासूनच ते विद्यार्थी चळवळीत सक्रिय होते. सोमय्यांनी जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनात भाग घेतला होता. लोहियांचा त्यांच्यावर विद्यार्थीदशेत प्रचंड प्रभाव होता. नंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. 1991मध्ये ते मुलुंडमधून भाजपच्या तिकीटावर आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांनी विधानसभेत महत्त्वाची विधेयके सादर केली होती. त्यांनी आमदार म्हणून लघु गुंतवणूकदार. महाराष्ट्र संरक्षण कायदा, कोरोनर्स कोर्ट (पोस्टमॉर्टम) कायदा रद्द करणे आणि गृहनिर्माण संस्था कन्व्हेयन्स विधेयक सादर केले.

अन् तिकीट कापलं गेलं

1995मध्ये ते भाजपचे मुंबई अध्यक्ष होते. त्यावेळी शिवसेना-भाजप युती सत्तेत आली होती. त्यानंतर 1999मध्ये ते मुंबई-उत्तर-पूर्व लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले होते. त्याच मतदारसंघातून ते 2014मध्ये दुसऱ्यांदा निवडून आले होते. 2019च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना उभं राहायचं होतं. मात्र, मीडिया रिपोर्टनुसार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी बिनसल्यामुळे त्यांचं तिकीट कापलं गेलं. त्यानी भाजपचे महाराष्ट्र उपाध्यक्ष आणि भाजपचे राष्ट्रीय सचिव म्हणूनही काम पाहिलं आहे.

विविध समित्यांवर काम

स्थायी समितीचे अध्यक्ष (लेबर), लोक लेखा समिती, सामान्य प्रयोजन समिती सदस्य, गृहसमितीचे अध्यक्ष, नागरी विकास मंत्रालय, वित्त संबंधी स्थायी समिती, विशेषाधिकार समिती आणि सल्लागार समितीवर त्यांनी सदस्य म्हणून काम पाहिलं आहे.

डझनभर मानहानीचे दावे

गेल्या दशकभरापासून त्यांनी भ्रष्टाचारविरोधी लढणारा नेता म्हणून स्वत:ची इमेज तयार केली आहे. अगदी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपासून परिवहन मंत्री अनिल परब यांच्यापर्यंत अनेकांची भ्रष्टाचाराची प्रकरणे त्यांनी बाहरे काढली आहेत. त्यांच्या विरोधात दोन डझन मानहानीचे खटले दाखल आहेत. तर त्यांनी स्वत: 15 जणांविरोधात अब्रुनुकसानीचे दावे दाखल केले आहेत. माझी लढाई ही कोणत्याही व्यक्ती विरोधात नाही. ती भ्रष्टाचाराविरोधात आहे, असं ते सांगतात.

 

संबंधित बातम्या:

जेवढा मोठा संघर्ष तेवढं मोठं यश, चौथ्या प्रयत्नात यशस्वी झालेल्या IPS वैभव गायकवाडांची प्रेरणादायी गोष्ट

Video: गुमराह तो वो है जो घर से निकले नही, चुकीचे निर्णयही का अनमोल असतात ऐका IPS तेजस्वी सातपुतेंकडून !

राजेश पायलट: ‘दूधवाला’ ते ‘केंद्रीय मंत्री’; इंदिराजींनाही म्हणाले होते, पाकवर बॉम्ब टाकलेत, लाठ्याकाठ्या झेलू शकत नाही?