मुंबई: चिपी विमानतळाच्या लोकार्पणाच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे काल एका मंचावर आले. तब्बल 12 वर्षानंतर पहिल्यांदाच दोघे एका मंचावर आले. त्यामुळे या दोघांमध्ये या निमित्ताने सुसंवादाला सुरुवात होईल असं सांगितलं जात होतं. मात्र, पावणे दोन तास एकत्र राहूनही दोन्ही नेत्यांनी एकमेकांशी बोलणं सोडा, साधं एकमेकांकडे पाहणंही टाळलं. त्यामुळे दिलजमाईची संधी कुणी दडवली? नारायण राणेंनी की उद्धव ठाकरे यांनी? याबाबतच्या चर्चांनी जोर धरला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नारायण राणे तब्बल 1 तास 38 मिनिटं आणि 32 सेकंद एकाच कार्यक्रमात होते. स्टेजवर तर हे दोन्ही नेते तासभर आजूबाजूला बसले होते. मात्र, दोन्ही नेत्यांनी एकमेकांकडे क्षणभरही पाहिलं नाही की एकमेकांशी संवाद साधला नाही. त्यामुळे या दोन्ही नेत्यांमधील वैर अजून संपलेलं नसल्याचं पुन्हा एक दा अधोरेखित झालं आहे.
दरम्यान, राणे आणि मुख्यमंत्री एकमेकांशी बोलताना किंवा एकमेकांकडे पाहतानाही दिसले नाही. मात्र, राणे यांनी भाषणामध्ये मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याशी संवाद साधल्याचा दावा केला. मुख्यमंत्री माझ्या कानात काही तरी बोलले. मला एकच शब्द ऐकायला मिळाला असं राणे म्हणाले.
दोन्ही नेत्यांनी एकमेकांशी काहीही संवाद साधला नाही. मात्र, दोघांनी भाषणातून एकमेकांना टोले लगावणं काही सोडलं नाही. आधी राणेंचं भाषण झालं. त्यावेळी त्यांनी शिवसेनेसह मुख्यमंत्र्यांना चिमटे काढले. मुख्यमंत्र्यांना होणारं ब्रिफिंग चुकीचं आहे, विमानतळाला शिवसेनेच्याच नेत्यांनी विरोध केला, चिपी विमानतळ आपल्याचमुळे होत आहे, सिंधुदुर्गाचं श्रेय आपलंच आहे आदी मुद्दे राणेंनी मांडली. तर राणेंच्या या टीकेचा मुख्यमंत्र्यांनी खरपूस समाचार घेतला. आपण केंद्रात मंत्री आहात. लघू का असेना, सुक्ष्म का असेना पण मोठं खातं आहे. त्याचा उपयोग महाराष्ट्राला नक्की करुन द्याल ही तुमच्याकडून मला अपेक्षा आहे, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. पाठांतर करुन बोलणं वेगळं, आत्मसात करुन तळमळीने बोलणं वेगळं आणि मळमळीने बोलणं आणखी वेगळं असतं. त्याबद्दल मी नंतर बोलेल, असा चिमटाही मुख्यमंत्र्यांनी राणेंना काढला. तसेच खोटं बोलणाऱ्यांची शिवसेना प्रमुखांनी हकालपट्टी केली होती, असंही मुख्यमंत्री राणेंचं नाव न घेता म्हणाले.
दुराव्याला केवळ राणेच कारणीभूत नाही. त्याला वेगवेगळी कारणं आहेत. शिवसेनेतील कारवाया आणि इतर कारणेही आहेत. केवळ राणे हे कारण असतं तर दुरावा दूर झाला असता. राणेंमुळे निर्माण झालेला नाही. राणेंनी तो ओढवून घेतला आहे. मोदी-शहांमुळे हा दुरावा झालेला आहे. शिवसेनेची बदललेली राजकीय भूमिका हेच त्या दुराव्याचं कारण आहे, असं राजकीय विश्लेषक सांगतात.
राणेंच्या राजकारणाचा यूएसपीच तो आहे. शिवसेनेच्या विरुद्ध बोलणं हाच त्यांचा यूएसपी आहे. कानाखाली वाजवण्यापर्यंतची ते भाषा करू शकतात. त्यामुळे ते एका रात्रीत बदलतील असं वाटत नाही. किंवा त्यांना भाजपने बदलायला सांगितलंय असंही दिसत नाही. शिवसेनेबरोबर आपल्याला जुळवून घ्यायचंय असं जर भाजपने त्यांना सांगितलं असतं तर कदाचित ते अशी भाषा वापरणार नाहीत. पण त्यांना शिवसेनेच्या विरोधातील कडवा नेता, शिवसेनेविरोधात कडवी भूमिका घेणारा नेता हीच आयडेंटिटी पुढच्या काळातही पाहिजे. बाकी दुसरी आयडेंटिटी काय त्यांची, असंही राजकीय जाणकारांनी सांगितलं.
मुख्यमंत्र्यांना नंतर बोलायची संधी मिळाली. राणेंनी औचित्य भंग केला. त्यामुळे त्यांनाही संधी मिळाली. फुलटॉस दिल्यावर मुख्यमंत्रीही कशाला सोडतील. कधीही आपल्यानंतर बोलणाऱ्याला डिवचू नये हे साधं राजकारणातील गणित आहे. तुम्ही डिवचलं तर संपलंच, असंही राजकीय विश्लेषक सांगतात.
संबंधित बातम्या:
VIDEO: शिवसेनेतून माझी हकालपट्टी?, उगाच काही तरी म्हणू नका; राणे मीडियावरच भडकतात तेव्हा…
माझ्यासाठी आदित्य ठाकरे टॅक्स फ्री; राणेंचे आदित्य यांना चिमटे आणि सल्ला
(why cm uddhav thackeray and narayan rane can’t come together?, read inside story)