कालपर्यंत फक्त ठाकरे सरकारच्या फक्त 5 मंत्र्यांनाच कोरोना झाल्याची माहिती होती. मात्र 5 नव्हे तर तब्बल 10 मंत्र्यांना कोरोना झाल्याचं अजित पवारांनी म्हटलंय…. म्हणजे ठाकरे सरकारमधल्या 32 मंत्र्यांपैकी सध्या 10 मंत्री कोरोनाबाधित आहेत… आणि जवळपास 20 हून जास्त नेत्यांनाही लागण झालीय…
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात
शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड
आदिवासी मंत्री के. सी. पाडवी
ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे
महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर
खासदार सुप्रिया सुळे
आमदार सागर मेघे
आमदार राधाकृष्ण विखे पाटील
आमदार शेखर निकम
आमदार इंद्रनील नाईक
मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील
पुण्याच्या आमदार माधुरी मिसाळ
माजी मंत्री दिपक सावंत
माजी मंत्री हर्षवर्धन पाटलांना कोरोना झालाय
विशेष म्हणजे ही सर्व नेतेमंडळी फक्त मागच्या 4 दिवसात बाधित झालीयत. अजित पवारांनी विधानसभेत आणि विधानसभेच्या बाहेर दोन्हीकडे नेत्यांना कोरोना होईल, अशी भीती व्यक्त केली होती. आता ते खरं होत असल्याचं दिसतंय. तसंच अनेकांना कोरोनाची लागण होत असल्यानं संसर्गाची भीतीही वाढतेय.
गर्दी आणि लॉकडाऊनवरुनही नेत्यांमध्ये राजकारण रंगतंय. उत्तर प्रदेशच्या निवडणुकीसाठी जमणाऱ्या गर्दीवर महाराष्ट्र सरकारमधील मंत्र्यांनी बोट ठेवलंय.
एकीकडे केंद्रीय आरोग्यखात्याचे सचिव महाराष्ट्रासहीत इतर राज्यांना सतर्क राहण्याचे आदेश देतायत तर दुसरीकडे लसीकरणामुळे कोरोनाचा त्रास कमी होईल, मात्र ठाकरे सरकारनं भीती पसरवू नये, असा दावा भाजपचे खासदार किरीट सोमय्या करतायत.
सत्ताधारी असोत वा विरोधक…सगळेच जण गर्दी टाळण्याचं आवाहन करतायत. मात्र निवडणुकांसाठीची गर्दी असो, लग्नांसाठीची गर्दी असो किंवा मग देवदर्शनासाठी… गर्दीवर कोणत्याच सरकारचं नियंत्रण नाहीये. औरंगाबादमधल्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात तर खुद्द राज्याच्याच आरोग्यमंत्र्यांना मास्कचा विसर पडल्याचं दिसलं होतं.
एकीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार सर्वांना मास्क घालण्याचं वारंवार आवाहन करतायत, ज्याबद्दल विरोधकांकडूनही त्यांचं कौतुक होतंय. मात्र राष्ट्रवादीचेच अनेक नेते सार्वजनिक कार्यक्रमांना विनामास्क दिसतायत..
केंद्रीय आरोग्य सचिवांच्या सूचना महाराष्ट्रासाठी विशेष खबरदारीच्या आहेत… कारण, सध्या देशातले सर्वाधिक ओमिक्रॉन बाधित महाराष्ट्रातून समोर आले आहेत. समोर आलेल्या आकडेवारीनुसार,
दुपारपर्यंत महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे 454, दिल्लीत 351, तामिळनाडूत 120 आणि गुजरातमध्ये 115 रुग्ण आढळून आलेत. सध्या देशात ओमिक्रॉनच्या एकूण रुग्णांची संख्या 1502वर गेलीय. त्यापैकी 512 लोक बरे झाले आहेत. 986 लोकांवर उपचार होतायत. तर अद्याप ओमिक्रॉनमुळे एकही मृत्यू झाल्याची नोंद नाहीये. ओमिक्रॉनच्या फैलावानंतर आज अमेरिका आणि ब्रिटनमध्ये ज्यापद्धतीनं रुग्णवाढ होऊ लागलीय, ती रुग्णवाढ कोरोनाच्या जन्मापासूनची सर्वाधिक रुग्णवाढ ठरली आहे.
अमेरिकेत शुक्रवारी एकाच दिवशी 4 लाख 43 हजार रुग्ण वाढले. ब्रिटनमध्ये एकाच दिवसात 1 लाख 89 हजार रुग्ण निघाले आणि भारतात 22 हजार रुग्णांची वाढ झालीय, मात्र येत्या काही काळात यात अजून मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
कोरोना लाटेबाबत आजवर अनेक तज्ज्ञांनी दिलास्याचे संकेत दिले आहेत. मात्र नेहमी कोरोनाबाबत जगाला सतर्क करणाऱ्या जागतिक आरोग्य संघटनेनं नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी एक चांगली बातमीही दिलीय. जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार 2022 हे कोरोनाच्या फैलावाचं शेवटचं वर्ष असेल. याच वर्षात कोरोनाचा अंत होईल. मात्र त्यासाठी नव्या वर्षातल्या जूनपर्यंत जगातल्या सर्व देशांमध्ये किमान 50 टक्क्यांहून जास्तीचं लसीकरण गरजेचं आहे.
अशातच जवळपास 5 महिन्यांच्या ब्रेकनंतर महाराष्ट्रात कोरोनाचा ग्राफ पुन्हा वरच्या दिशेनं सरकू लागलाय. डिसेंबरच्या अखेरच्या दिवसांत झालेली रुग्णवाढ चिंता वाढवणारी आहे.
20 डिसेंबर 544 रुग्ण
23 डिसेंबर 1179
26 डिसेंबर 1648
28 डिसेंबर 2172
30 डिसेंबर 5368
31 डिसेंबर 8068
फक्त 10 दिवसात 544 रुग्णसंख्येवरुन 8068 पर्यंतची रुग्णवाढ पुन्हा टेन्शन वाढवणारी आहे. महाराष्ट्राबरोबरच देशाचाही कोरोनाचा आलेख वाढत चाललाय. 25 डिसेंबरच्या दिवशी देशात 6987 रुग्ण निघालेत. 28 डिसेंबरला 9100, 30 डिसेंबरला 16 हजार 764 आणि 31 डिसेंबरला थेट 22 हजार 775 रुग्ण आढळलेत. म्हणजेच फक्त 24 तासात देशातल्या कोरोना रुग्णसंख्येमध्ये 36 टक्क्यांनी वाढ झालीय.
सध्या देशातले सर्वाधिक ओमिक्रॉनचे रुग्ण महाराष्ट्रात आहेत. आणि दुसरं टेन्शन म्हणजे दुसऱ्या लाटेची सुरुवात जशी अमरावतीतून झाली होती, तशीच तिसऱ्या लाटेचं केंद्र मुंबई ठरतंय की काय, अशी शंका येऊ लागलीय. कारण महाराष्ट्रात शुक्रवारी जे 8 हजार 67 रुग्ण निघाले, त्यापैकी 5631 रुग्ण एकट्या मुंबईतले होते. एकट्या मुंबईतली रुग्णवाढ ही उर्वरीत महाराष्ट्रातूनही भीषण आहे…
20 डिसेंबर191 रुग्ण
23 डिसेंबर 577
27 डिसेंबर 788
30 डिसेंबर 3555
31 डिसेंबर 5428
मात्र फक्त रुग्णच वाढतायत असंही नाही. मुंबईत कोरोना चाचण्यांचही प्रमाण वाढवलं गेलंय.15 दिवसांपूर्वी मुंबईत दिवसाला 25 ते 28 हजार कोरोना चाचण्या व्हायच्या. सध्या मुंबईत दिवसाला 47 ते 50 हजार लोकांच्या कोरोना चाचण्या होऊ लागल्यायत. थंडी वाढल्यामुळे मुंबईत व्हायरल इन्फेक्शननंही जोर धरलाय. त्यामुळे अनेक लोकांमध्ये सर्दी, अंगदुखी आणि तापाची लक्षणं जाणवतायत. मुंबईतल्या या तिसऱ्या संभाव्य लाटेचं वैशिष्ठ्य म्हणजे दुसऱ्या लाटेवेळी संपूर्ण मुंबईत कोरोनाचा उद्रेक झाला होता. मात्र यावेळी फक्त उच्चभू लोकवस्तींमध्ये कोरोनाचं प्रमाण सर्वाधिक आहे.
उदाहरणार्थ शुक्रवारी मुंबईत जे 5428 रुग्ण निघाले त्यापैकी धारावीतल्या रुग्णांची संख्या फक्त 34 आहेत. बाकी 90 टक्के रुग्ण हे अंधेरी, वांद्रे, फोर्ट, ग्रँण्ट रोड, गिरगाव या भागातून पुढे येतायत. शुक्रवारी निघालेल्या 8068 रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण मुंबई, पुणे, ठाणे, सातारा, नाशिक, पिंपरी-चिंचवड आणि सातारा आणि त्यापाठोपाठ नागपुरात होते.
मात्र अशीच रुग्णवाढ जर जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत कायम राहिली. तर महाराष्ट्रात दोन लाखांहून जास्त रुग्ण उपचारासाठी दवाखान्यात दाखल होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून आत्तपासूनच रुग्णालयांमध्ये खाटा आणि ऑक्सिजन पुरवठ्याची पूर्तता केली जातेय. मात्र जर रुग्णवाढ झाली, आणि रुग्णभरतीचं प्रमाण कमीच राहिलं, तर ही लाट ज्या वेगानं वाढत आहे, त्याच वेगानं कमी होईल, असाही अंदाज वर्तवला जातोय.