‘महाराष्ट्र बंद’मधून शेतकऱ्यांच्या आंदोलनाला बळ की मोदी सरकारला इशारा?; वाचा स्पेशल रिपोर्ट

| Updated on: Oct 11, 2021 | 7:36 AM

(why maha vikas aghadi call maharashtra bandh?, read inside story)

महाराष्ट्र बंदमधून शेतकऱ्यांच्या आंदोलनाला बळ की मोदी सरकारला इशारा?; वाचा स्पेशल रिपोर्ट
MAHARASHTRA BANDH
Follow us on

मुंबई: लखीमपूर हिंसेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. सत्ताधाऱ्यांनी बंदची हाक देण्याची ही पहिलीच घटना आहे. मात्र, या बंदचे अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला बळ देण्यासाठी हे आंदोलन आहे की मोदी सरकारला इशारा देण्यासाठी हे आंदोलन आहे? अशी चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे.

लखीमपूरमध्ये काय घडलं?

उत्तर प्रदेशाच्या लखीमपूर खीरीमध्ये राज्यातील मंत्र्यांविरोधात शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु होतं, ज्या आंदोलनात 2 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. गेल्या रविवारी राज्यातील विकासकामाच्या उद्घाटनासाठी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि केंद्रिय मंत्री अजय मिश्र आले होते. त्यांना विकासकामाचं उद्घाटन केल्यानंतर एका कार्यक्रमासाठी बनवीरपूर गावात जायचं होतं. दरम्यान, इथं मंत्री येणार असल्याने कृषी कायद्याला विरोध करणारे शेतकरी इथं एकत्र झाले, आणि काळे झेंडे घेऊन ते तुकुनिया परिसरात पोहचले. दरम्यान, यावेळी मंत्र्याच्या जाणाऱ्या गाड्यांच्या स्वॉर्डने विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांना चिरडलं. केंद्रीय मंत्री अजय मिश्र यांचा मुलगा अभय मिश्रने हे कृत्य केल्याचा गंभीर आरोप, घटनास्थळी असेलल्या शेतकऱ्यांनी केला आहे. या दुर्घटनेत 2 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला, संतापलेल्या शेतकऱ्यांनी 3 गाड्या जाळून टाकल्या, यूपीत हिंसाचार उफाळला, ज्यात आतापर्यंत 8 लोक मृत्यूमुखी पडल्याची माहिती आहे.

महाविकास आघाडीची भूमिका काय?

लखीमपूर इथे शेतकऱ्यांना चिरडल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेसने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. त्याला महाविकास आघाडीतील शिवसेना आणि काँग्रेसनेही सहमती दर्शवली आहे. लखीमपूर घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली असून, येत्या 11 ऑक्टोबरला हा बंद पुकारण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने 11 ऑक्टोबरला बंद करण्यात येणार असल्याचा निर्णय जयंत पाटील यांनी जाहीर केला. हा बंद पक्षाच्या वतीने आहे सरकारच्या वतीने नाही. मात्र महाविकास आघाडीमधील इतर मित्रपक्षासोबतदेखील आम्ही बोलणार आहोत की त्यांनी बंदमध्ये सहभागी व्हावं, असं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितलं.

महत्त्वाचं म्हणजे जयंत पाटील यांच्या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात उपस्थित होते. शेतकऱ्यांचा पाठीशी शिवसेना नेहमी राहिली आहे, त्यामुळे बंदमध्ये आम्ही सहभागी होणार आहोत, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. तर शेतकरी आंदोलन चिरडताना भाजपची मानसिकता दिसून आली, जनरल डायरच्या भूमिकेत भाजप दिसून आली, असं बाळासाहेब थोरात म्हणाले.

बंदवरून वेगळी चर्चा का?

गेल्या काही महिन्यांपासून ठाकरे सरकारमधील मंत्री आणि पक्षातील नेत्यांवर आयकर विभाग, ईडी आणि सीबीआयचं धाडसत्रं सुरू आहे. त्यामुळे आघाडीतील अनेक नेते अडचणीत आले आहेत. तर, भाजपचे नेते किरीट सोमय्यांकडून सातत्याने नवनवे घोटाळे उघड केले जात आहे. एवढेच नव्हे तर अजित पवार यांच्यांशी संबंधित कंपन्यांवर आयकर विभागाने धाडी टाकल्या आहेत. तसेच अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार आणि अजितदादांच्या बहिणींच्या घरांवरही धाडी टाकण्यात आल्या आहेत. त्यामुळे आघाडी सरकारचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे मोदी सरकारला इशारा देण्यासाठीही हा बंद पुकारण्यात येत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

मोदी सरकारला इशाराच

उद्याचा बंद हा मोदी सरकारला इशाराच आहे. त्यातून शेतकरी आंदोलनाला राजकीय बळ मिळेल. परंतु, प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पदरात काही पडेल असं वाटत नाही. मोदी विरोध प्रत्येक राजकीय पक्ष एनकॅश करायला बघत आहे. त्यात शेतकऱ्यांचं हित हे दुय्यम स्थानावर गेलं आहे. राजकीय हित प्रथम स्थानावर आलं आहे. विरोधकांकडे महागाई आणि शेतकरी हे दोन घटक सोडले तर स्ट्राँग दारूगोळा नाहीये. त्यामुळे जे आहे त्याला अधिक हवा द्यायची आणि त्याचा काही उपयोग होतो का बघायचं अशी विरोधकांची रणनीती दिसते, असं ‘आपलं महानगर’चे ठाणे आवृत्तीचे निवासी संपादक सुनील जावडेकर यांनी सांगितलं.

भाजपचा व्होटर आणि धाडींचा परिणाम

विचार भिन्न असलेलं सरकार राज्यात आहे. पण ग्रासरूटला भाजपचा जो मतदार आहे किंवा भाजपला जी मतदारांची सहानुभूती आहे, ती तेवढी कमी झालेली यांना जाणवत नाही. ती जर कमी करायची असेल तर असे विषय वाढवण्याशिवाय आघाडीकडे पर्याय नाही. राज्य सरकार हे केंद्र सरकारच्या विरोधी विचारांचं आहे. त्यामुळे त्यांनी आक्रमकपणा दाखवणं स्वाभाविक आहे. पवार घटक हा या सरकारमधला अत्यंत महत्त्वाचा आहे. आता ज्या काही घडामोडी घडत आहे. नातेवाईकांवर छापेमारी होत आहे. त्यामुळे मोदीविरोधाला त्यांना राजकीय स्वरुप द्यायचं आहे. शिवाय ज्या रेड पडत आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांकडून आघाडीच्या नेत्यांमागे लावण्यात आल्या आहेत. तेही एक उद्याच्या बंदचं कारण असू शकतं, असं जावडेकर म्हणाले.

 

संबंधित बातम्या:

Lakhimpur Kheri Violence : “अंगाला हात तर लावून दाखवा”, प्रियंका गांधी यूपी पोलिसांवर कडाडल्या, यूपी पोलिसांनाच दिले कायद्याचे धडे

UP Lakhimpur Kheri new viral video : लखीमपूर खीरीतील थरारक व्हिडीओ, आंदोलकांना जिवंत चिरडलं

अजित पवार आता जास्त दिवस बाहेर राहणार नाहीत, निलेश राणेंचा खळबळजनक दावा

(why maha vikas aghadi call maharashtra bandh?, read inside story)