मुंबई: भाजप नेत्या पंकजा मुंडे (pankaja munde) यांना पुन्हा एकदा विधान परिषदेच्या उमेदवारीने हुल दिली आहे. भाजपने (bjp) पाच जणांची यादी घोषित केली. त्यात पंकजा मुंडे यांचं नाव नाही. त्यामुळे सहावा उमेदवार म्हणून भाजप पंकजा यांना मैदानात उतरवतील असं चित्रं होतं. परंतु, भाजपने सदाभाऊ खोत यांना अपक्ष उमेदवार म्हणून पाठिंबा दिला आहे. विशेष म्हणजे भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीत देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांच्यी पीएचा समावेश आहे. तर दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या दोन समर्थकांचा समावेश आहे. मात्र, गोपीनाथ मुंडे यांच्या कन्येलाच या यादीतून वगळण्यात आलं आहे. पंकजा मुंडे या मास लीडर आहेत. चांगल्या वक्त्या आहेत आणि कुशल संघटक आहेत. तरीही त्यांच्या उमेदवारीवर फुली मारण्यात आल्याने पंकजा समर्थकांमध्ये खदखद निर्माण झाली आहे. तर पीए आणि समर्थक आमदार होऊ शकतात तर पंकजा मुंडे का नाही? असा सवाल केला जात आहे.
भाजपने प्रवीण दरेकर, उमा खापरे, प्रसाद लाड, श्रीकांत भारतीय आणि राम शिंदे यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे. तसेच सदाभाऊ खोत यांना अपक्ष म्हणून पाठिंबा दिला आहे. या यादीतून विनायक मेटे यांना डच्चू देण्यात आला आहे. तर प्रत्येक वेळी विधान परिषदेची चर्चा सुरू असताना पंकजा मुंडे यांचे नाव चर्चेत असते. यावेळी त्यांना तिकीट मिळेल असं वाटत होतं. पण त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे.
भाजपच्या यादीत एका पीएचा आणि दोन समर्थकांचा समावेश आहे. श्रीकांत भारतीय हे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांचे ओएसडी होते. त्यांनाही तिकीट देण्यात आलं आहे. तर राम शिंदे आणि उमा खापरे हे दोघेही जण दिवंगत गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक आहेत. त्यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळेच पीए आणि मुंडेंच्या शिष्यांना उमेदवारी दिली जाते तर पंकजा यांना का दिली जात नाही? असा सवाल पंकजा समर्थक करत आहेत.
पंकजा मुंडे या मुख्यमंत्रीपदाच्या प्रबळ दावेदार आहेत. त्यांची स्पर्धा थेट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याशी आहे. त्यामुळे स्पर्धकांना मोठं न करण्याचं देवेंद्र फडणवीस यांचं धोरण आहे. त्यामुळेच त्यांनी पंकजा मुंडे यांना संधी देण्यात आली नसावी, असं ज्येष्ठ पत्रकार सुनील जावडेकर यांनी सांगितलं. पीए आणि समर्थकांना मोठं केलं जातं. त्यांना संधी द्यायची पण पंकजा मुंडेंना संधी द्यायची नाही हे त्यामागचं धोरण आहे. यापूर्वीही भागवत कराड यांना केंद्रात संधी दिली. ते गोपीनाथ मुंडे यांचे समर्थक होते. आता उमा खापरे आणि राम शिंदे या गोपीनाथ मुंडे यांच्या समर्थकांना संधी दिली गेली आहे, असंही जावडेकर म्हणाले.
पंकजा मुंडे यांना तिकीट नाकारण्यात आल्याने एकनाथ खडसे यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. मुंडे आणि महाजन या दोन्ही परिवारांनी आपले आयुष्य भारतीय जनता पार्टीसाठी खर्ची घातले. परंतु, तरीही त्यांना डावलण्यात येत आहे. आज कोणीही नवखे आले की त्यांच्यासाठी पक्ष उमेदवारी देतो. पंकजा मुंडे यांना तिकीट न देणे खरोखरच दुर्दैवी आहे. मुंडे, महाजन यांनी या सगळ्यांना आणि पक्षाला मोठे केले. मात्र त्यांच्या कुटुंबियांना अशी वागणूक दिली जात आहे. विरोधी पक्षनेते फार अनुभवी आहेत आणि कदाचित म्हणून त्यांनी त्यानुसार निर्णय घेतला असेल, असा टोला एकनाथ खडसे यांनी लगावला आहे.
परभणीतील पंकजा मुंडे समर्थकही संतापले आहेत. गंगाखेड तालुक्यात कमळ चिन्ह हद्दपार करणार असल्याचा इशारा पंकजा मुंडे समर्थकांनी दिला आहे. ताई नाही तर भाजपा नाही..! अशी पोस्ट या समर्थकांनी व्हायरल केली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात जिल्ह्यात भाजपाची सर्वाधिक ताकद असलेल्या गंगाखेड तालुक्यामध्ये भाजपला फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.