भारतात हाय ब्लड प्रेशरचा त्रास असणाऱ्या एक चतुर्थांश पेक्षा कमी रुग्णांचा रक्तदाब नियंत्रणात राहतो. 'द लॅन्सेट रिजनल हेल्थ' या रिसर्च जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासातून हा खुलासा झाला आहे. हृदयविकाराच्या रुग्णांसाठी हाय ब्लडप्रेशर हा एक महत्वाचा घटक आहे, जो अकाली मृत्यूचे एक प्रमुख कारण ठरतो.
दिल्लीतील राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र आणि अमेरिकेतील बोस्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ येथील संशोधकांनी 2001 पासून प्रकाशित झालेल्या 51 अभ्यासांचा सविस्तर आढावा घेतला. त्या आधारे भारतातील हाय ब्लडप्रेशरच्या नियंत्रणाचा दर आढळून आला.
त्यामध्ये संशोधकांना असे आढळले की, 21 अभ्यासांमध्ये (41 टक्के) महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये उच्च रक्तदाब नियंत्रणाचे प्रमाण सर्वात वाईट होते. तर 06 अभ्यासांमध्ये (12 टक्के) ग्रामीण रुग्णांमध्ये नियंत्रणाचे प्रमाण अधिक वाईट असल्याचे आढळून आले.
2016-2020 या वर्षांत भारतातील एक चतुर्थांश पेक्षा कमी रुग्णांचा रक्तदाब नियंत्रणात होता. मात्र, गेल्या काही वर्षांत (नियंत्रण) दरात सुधारणा झाली आहे, असे संशोधनातील लेखकांनी नमूद केले.
हृदयरोगाच्या रुग्णांचे मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी हाय ब्लडप्रेशरचा नियंत्रण दर सुधारणे अत्यंत गरजेचे आहे. कारण हाय ब्लडप्रेशर हे भारतात मृत्यूचे एक प्रमुख कारण आहे.