आमिर खानची लाडकी लेक आयरा खान उद्या (3 जानेवारी) लग्नबंधनात अडकणार आहे. त्यापूर्वी हळदीच्या कार्यक्रमात आमिरच्या दोन्ही पूर्व पत्नींनी सर्वांचं लक्ष वेधलं आहे. आमिरची पहिली पत्नी रिना दत्ता आणि दुसरी पत्नी किरण राव या दोघी नऊवारी साडी नेसून कार्यक्रमाला पोहोचल्या आहेत.
रिना आणि किरण यांच्यातील नातं याआधीही अनेकदा चर्चेत आलं आहे. एकमेकींच्या सवत असूनही दोघींना नेहमीच एकमेकांसोबत मैत्रिणींसारखं वावरताना पाहिलं गेलंय. आता पुन्हा एकदा त्यांच्यातील मैत्री आणि समजुतदारपणा आयरा खानच्या लग्नाच्या वेळी दिसून येत आहे.
आमिर खानने 18 एप्रिल 1986 रोजी रिना दत्तासोबत लग्न केलं होतं. या दोघांचा प्रेमविवाह झाला होता. पण 2002 मध्ये घटस्फोट घेतल्यानंतर आमिर आणि रिना विभक्त झाले. त्यानंतर आमिरने किरण रावशी 2005 मध्ये लग्न केलं. आमिरचं हे दुसरं लग्नही टिकलं नाही. 2021 मध्ये किरण आणि आमिरने घटस्फोट घेतला.
आमिरला पहिल्या पत्नीपासून आयरा ही मुलगी आणि जुनैद हा मुलगा आहे. तर किरण राव आणि आमिर यांना आझाद हा मुलगा आहे. घटस्फोटानंतरही आमिरने दोन्ही पूर्व पत्नींसोबत मैत्रीचं नातं जपलं आहे. पाणी फाऊंडेशनच्या कामासाठी हे तिघं अनेकदा एकत्र येताना दिसतात.
घटस्फोटानंतर दोन्ही पूर्व पत्नींसोबत असलेल्या नात्याविषयी आमिर खान 'कॉफी विथ करण' या चॅट शोमध्ये व्यक्त झाला होता. "माझे दोघींशी (रिना आणि किरण) चांगले संबंध आहेत आणि मी दोघांचा तितकाच आदर करतो. आम्ही नेहमीच कुटुंब म्हणून एकत्र राहू," असं तो म्हणाला होता.
म्हणूनच कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये या तिघांना अनेकदा एकत्र पाहिलं जातं. रिना आणि किरण यांच्यातही मैत्रीपूर्ण संबंध आहेत. तर चित्रपट निर्मितीसाठी आमिर आणि किरण आतासुद्धा एकत्र काम करतात.