झी मराठी वाहिनीवरील 'अप्पी आमची कलेक्टर' या मालिकेचं कथाकन रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. बाबांना दिलेलं वचन पूर्ण करण्यासाठी अर्जुन आर्यासोबत लग्न करायचा निर्णय घेतो.
दुसरीकडे रुपाली बाबांची परिस्थिती बघून चिडते आणि ती अर्जुनकडून त्याच्या नकळत अप्पीला घटस्फोटाचे पेपर्स पाठवते. घटस्फोटाचे पेपर्स पाहून तिच्या पायाखालची जमीनच सरकते. तिला अमोलचं टेन्शन येतं.
अप्पीने बाबाचं वर्णन जसं केलं त्यावरून अमोल एक चित्र काढतो. तो यात बापू, दिप्या, गायतोंडे, अप्पी या सर्वांची मदत घेतो आणि ते चित्र पूर्ण करायला लागतो. अप्पीला विनायकची परिस्थिती समजते आणि ती त्यांना जाऊन भेटते.
तेव्हा रुपाली तिला विनायकने घेतलेल्या वचनाबद्दल सांगते आणि अर्जुन आणि आर्याचा साखरपुडा होणार असल्याचं सांगते. अप्पी तिथून निघताना विनायकची परिस्थिती आणि अर्जुनने विनायकला दिलेल्या वचनाचा विचार करून घटस्फोटाच्या पेपर्सवर सही करून पाठवते.
आर्याच्या आईला अर्जुनच्या पहिल्या लग्नाबद्दल कळतं आणि ती अर्जुनला अप्पीसाठी आर्याला सोडून तर जाणार नाही ना? म्हणून प्रश्न करते. अर्जुन त्यांना शब्द देतो की, तो परत अप्पीशी काहीही संबंध ठेवणार नाही.
इकडे अमोल त्याने काढलेले चित्र घेऊन बाबाला शोधण्यासाठी त्याच्या मास्टरच्या म्हणजेच अर्जुनच्या पोलीस स्टेशनला जातो. तिकडे चिंचुकेला सिम्बाच अर्जुनचा मुलगा असल्याचं समजतं. तर अमोल मास्टरसोबत बोलायचं म्हणतो आणि फोनवर अर्जुन त्याला साखरपुड्याला बोलावतो.