छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाला आणि बलिदानाला जगाच्या इतिहासात तोड नाही. संकटाला निर्भीडपणे सामोरं जात पराक्रमाच्या जोरावर अल्प काळात त्यांनी मराठा साम्राज्याचा विस्तार आणि संरक्षण केलं.
अशा पराक्रमी राजाचा जीवनपट उलगडणारा राकेश सुबेसिंह दुलगज निर्मित आणि दिग्दर्शित ‘छत्रपती संभाजी’ हा चित्रपट येत्या 2 फेब्रुवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. 'छत्रपती संभाजी' हा चित्रपट मराठी, हिंदी, तमिळ, तेलगू आणि इंग्रजीमध्ये एकाच वेळी प्रदर्शित होत आहे.
राजकारण, मुसद्देगिरी, समाजकारण, धर्मकारण यांच्यात मुरलेले छत्रपती संभाजी महाराज रणांगणावरचे शेर होते. स्वराज्यनिष्ठा, शौर्य, धैर्य अशा अनेक अंगाने अनेक मोहिमा यशस्वी करणाऱ्या महाराजांनी निर्माण केलेला प्रेरणादायी इतिहास 'छत्रपती संभाजी' या चित्रपटातून तरुण पिढीला पाहता येणार आहे.
राजकारणातील डावपेच, गनिमी कावा या जोरावर छत्रपती संभाजी महाराजांनी सलग नऊ वर्षे मुघल, आदिलशहा, सिद्धी, पोर्तुगीज, इंग्रज, आणि इतर अंतर्गत शत्रूंशी लढा देत, स्वराज्याला टिकवले आणि वाढविले. दुर्दम्य इच्छाशक्ती आणि अजोड पराक्रमाच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराजांनंतर छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर त्या साम्राज्याचा विस्तार केला.
प्रमोद पवार, शशांक उदापूरकर, रजित कपूर, दिलीप ताहिल, मृणाल कुलकर्णी, मोहन जोशी, भरत दाभोळकर, लोकेश गुप्ते, बाळ धुरी, दिपक शिर्के,अमित देशमुख , कै. आनंद अभ्यंकर, समीर, मोहिनी पोतदार, प्रिया गमरे अशी कलाकारांची मोठी फौज या चित्रपटात आहेत.