Audio Books : पुस्तक संस्कृती जतन करण्यासाठी ‘ऑडिओ बुक’ उत्तम पर्याय!, मराठमोळ्या कलाकारांचं मत
भारतातील विविध भाषांमधील ऑडिओबुक्सची मागणी आणि आवड पाहून सर्व प्रकारचे वाङ्मय मुबलक स्वरूपात ऑडिओ बुक्समध्ये ध्वनिमुद्रित होऊ लागले. साहित्यप्रेमी महाराष्ट्रात ही संख्या कैक पटीने वाढल्याचे निदर्शनास आले आहे. (Audio Books: 'Audio Book' is the best option to save book culture !, Marathi artists express their views)
1 / 7
संपूर्ण भारतात लॉकडाऊन जाहीर झाले आणि लोकांना काय करावे काय करू नये याची चिंता सतावू लागली. नागरिकांना आपल्या घरातून बाहेर पडण्यास बंदी घातल्यानंरत घरबसल्या मनोरंजनाचे विविध मार्ग शोधण्याकडे सर्वांचा कल दिसून येऊ लागला. यादरम्यान अभिरुचीसंपन्न लोकांनी ऑडिओबुक्स ऐकण्याचा छंद जोपासला. भारतातील विविध भाषांमधील ऑडिओबुक्सची मागणी आणि आवड पाहून सर्व प्रकारचे वाङ्मय मुबलक स्वरूपात ऑडिओ बुक्समध्ये ध्वनिमुद्रित होऊ लागले. साहित्यप्रेमी महाराष्ट्रात ही संख्या कैक पटीने वाढल्याचे निदर्शनास आले आहे. मुंबई, ठाणे, पुणेच नाही तर महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये ऑडिओबुक्स ऐकण्याकची परंपरा निर्माण होताना दिसत आहे. देशात विविध संस्थाद्वारे ऑडिओबुक्सची निर्मिती होत असून एकट्या स्टोरीटेल मराठीने महाराष्ट्रात लॉकडाऊन दरम्यान हजारो पुस्तकांचे ऑडिओबुक्समध्ये रूपांतर केले आहे. ऑडिओबुकमधील विविध प्रकारचे वाङ्मय ऐकण्यासाठी ज्ञानजिज्ञासुंची झुंबड उडत आहे. कोरोना काळात जवळपास 50 हुन अधिक मान्यवर अभिनेते - अभिनेत्रींनी या पुस्तकांना आपला विशेष आवाज देऊन दर्जेदार पुस्तकांचा अनमोल ठेवा आपल्या पुढच्या पिढीसाठी जतन करून ठेवण्यासाठी योगदान दिले आहे. निवडक कलावंतांनी प्रथम ऑडिओबुक रेकॉर्ड केल्यानंतर त्याबद्दल व्यक्त केलेल्या भावना खास त्यांच्याच शब्दात.
2 / 7
पुस्तकं संस्कृती जतन करण्यासाठी 'ऑडिओ बुक' हा उत्तम पर्याय! - अभिनेते सचिन खेडेकर : मला पुस्तकं वाचण्याची आवड आहे म्हणून खरंतर मी हे केलं, मी काही व्हाईस आर्टिस्ट नाही, पण मला ती ऑडिओबुक्सची एकूण कल्पनाच आवडली. आता वाचन संस्कृती कमी होतेय, वाचकांना चांगलं पुस्तक वाचायला मिळत नाही, किंवा वेळ मिळत नाही हे जे कारण आहे त्याला ऑडिओबुक्स हा उत्तम पर्याय आहे म्हणून खरंतर हे करावंसं वाटलं. मला नट म्हणून किंवा मराठी भाषेचा भक्त म्हणून ते करायला आवडतं. मला एका बाजून असंही वाटतं कि हा माझ्यादृष्टीने भाषा टिकविण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे, आपली पुस्तकं टिकवण्याचा ऑडिओबुक्स हा चांगला मार्ग आहे असं मला वाटतं. आणि मी जी स्टोरीटेलसाठी पुस्तकं वाचली आहेत ती मला मनापासून आवडली आहेत म्हणूनच मी ती वाचली आहेत. ऑडिओबुक्स ऐकण्यातून आपला छंदही जोपासला जाऊन लोकांना चांगलं ऐकण्याची सवयही लागेल असे मला वाटते.
3 / 7
ऑडिओबुक्स हे प्रेक्षकांना इनव्हॉल्व करणारं माध्यम - अभिनेता ललित प्रभाकर : एकतर पूर्णपणे नवीन माध्यम. इथे फक्त तुम्ही ऐकू शकता आणि त्या ऐकण्यातूनच तुम्हाला तुमची गोष्ट इमॅजिन करायची असते. मला वाटते कि ऑडिओ बुक्स हे खूप पावरफुल्ल माध्यम आहे, जे प्रेक्षकांनाही चॅलेंज करतं, इन्व्हॉल करून घेतं. कारण त्यांना त्या गोष्टी इमॅजिन कराव्या लागतात, नुसत्या ऐकून गोष्टी सोडून चालत नाहीत. प्रत्येक व्यक्ती त्याच्या त्याच्या इमॅजीननुसार बघू शकते. ऑडिओ बुक्समध्ये एकच गोष्ट मी जेव्हा बोलतो, साकारतो किंवा प्रेझेन्ट करतो तेव्हा ती ऐकणाऱ्या प्रत्येकापर्यंत वेगवेळी पोहचते आणि दिसते, मला वाटतं कि हि खूपच कमाल गोष्ट आहे स्टोरीटेल या ऍपची आणि त्यासाठीच मी खूप उत्सक होतो. मला असं वाटतं कि अभिनेता म्हणून मला माझा रियाझ करण्यासाठी आणि लर्न करण्यासाठी अश्या काही गोष्टी करत राहणं खूप गरजेचं असतं. मला एकाच वेळी आठ दहा कॅरेकटर्स प्ले करायचे होते आणि त्यातून माझं कॅरेक्टर वेगळं, शिवाय गोष्टही कळली पाहिजे असं सगळं करायचं होतं. हे सगळं आम्हाला चित्रपट - मालिकेत काम करताना करायची सवय नसते, आम्ही काम करताना एकच कॅरेक्टर करीत असतो. मात्र इथे हे सगळं करताना कलाकार म्हणून अधिक कस लागते, तुम्हाला थोडं पुश करावं लागतं स्वतःला.
4 / 7
ऑडिओ बुक्स रसिकांसाठी पर्वणी! - अभिनेता उमेश कामत : ऑडिओबुक रेकॉर्ड करण्यासाठी मी नेहमीच उत्सुक असतो, कारण माझा पहिला अनुभवच खूप विलक्षण होता. मी माझा पहिला ऑडिओ ड्रामा ६१ मिनिट्स रेकॉर्ड केला त्याचा रिस्पॉन्स आणि एकंदर त्याच्या रेकॉर्डिंग प्रोसेस मजेदार होती. सो जेव्हा माझ्याकडे ६१ मिनिट्स हि ऑडिओ कथा रेकॉर्डिंगसाठी आली तेव्हा मी खूपच एक्ससाईट, खूप पॉझिटिव्ह होतो. एकतर मला ती गोष्ट फार आवडली होती. मला सस्पेन्स आणि थ्रिल्लर गोष्टी फार आवडतात तश्याच रोमँटिक गोष्टीही आवडतात. त्यातलीच हि एक आयटी क्राईमच्या संदर्भातील गोष्ट स्टोरीटेल मराठी कडून विचारण्यात आली आणि ती मी वाचल्यानंतर मजा आली. मला जसं वाचताना पुढे काय पुढे काय होणार याची उत्सुकता होती, तीच उत्सुकता रेकॉर्डिंग करतानाही होती. सर्वच कॅरेक्टर्स खूप इंटरेस्टिंग होती. हा माझ्यासाठी खूप मस्त अनुभव होता. मी स्वतः रेकॉर्ड करताना त्या व्यक्तिरेखा खूप एन्जॉय केल्या आणि मला असं वाटतंय गोष्ट इतकी इंटरेस्टिंग झाली आहे कि ती लोकांना नक्की ऐकायला आवडेल. आणि मला असं वाटतंय सध्याच्या काळात आपलं ट्रॅव्हलिंग टायमिंग इतकं असतं, प्रत्येक वेळेला टिव्ही पाहणं किंवा सध्याच्या काळात चित्रपट, नाट्यगृहे बंद आहेत त्यामुळे स्टोरीटेल जी ऑडिओबुक्स तयार करताहेत ती मराठी रसिकांसाठी एक पर्वणीआहे असे मला वाटते आहे. सगळ्या प्रकारच्या कथा, लघुकथा, कादंबऱ्या, ऑडिओ सिरीज अश्या मुबलक ऑडिओबुक्सचा खजिना आपल्या सगळ्यांसाठी आहे, त्याचा सगळ्यांनी आनंद घ्यावा.
5 / 7
वाचनाची हॅबिट ऑडिओबुक्स मुळे पूर्ण करता येते! - अभिनेता आस्ताद काळे : मी ऑडिओ बुक करण्यासाठी खूपच उत्सुक होतो. मला डबिंग या क्षेत्रात काहीतरी सुरु करण्याची इच्छा होती. नशिबाने स्टोरीटेल हा चांगला प्लॅटफॉर्म आर्टिस्ट्ससाठी उपलब्ध झाला आहे. तुम्ही नट असलात तरी ह्या माध्यमात तुमचा चेहरा किंवा अभिनय दिसणार नाही, फक्त वाचिक अभिनयावर सगळं निभावून न्यायाचे आहे, हे चॅलेंज मला स्वतःहून स्वीकारायचं होत आणि हि संधी स्टोरीटेलने दिल्याने खरंतर मी खूप खुश झालो आहे. मला ऑडिओ बुक करायला खूप मजा आली. कारण जवळ जवळ सात आठ पात्र वेगवेगळ्या सिच्युएशन मध्ये एकमेकांशी बोलताहेत, एकाचवेळी चारपाच लोक बोलताहेत, या सगळ्या प्रकारे आवाज मॉड्युलेट करणं, प्रत्येकाचा लहेजा, पीच, वाणी वेगळी असणं हे सगळं मॅनेज करीत हे करण्याचा अनुभव खूपच मजेदार आणि चॅलेंजिंग अनुभव होता. माझ्या पिढीच्या आणि कामासाठी सतत प्रवास करणाऱ्यांना आपली वाचनाची हॅबिट ऑडिओबुक्समुळे पूर्ण करता येते. वाचनाचा अखंड आनंद ऐकण्यातून मिळविण्याची संधी ऑडिओबुक्स देतात.
6 / 7
ऑडिओबुक्स मनोरंजन आणि ज्ञानाचे उत्तम साधन! - अभिनेत्री गीतांजली कुलकर्णी : आवाज आणि त्याचा वापर आणि गोष्ट सांगणे हे मला एक अभिनेत्री म्हणून खूप चॅलेंजिंग वाटते. ऑडिओबुक्स हे नुसतं एकच माध्यम असं आहे ज्याच्यातून तुम्हाला पूर्ण वातावरण, पात्र उभं करायचं असतं. गोष्ट सांगणं हि अगदी मूलभूत कला आहे, अभिनेता अभिनेत्री म्हणून त्यात तुमचा हातखंडा असणं फार गरजेचं असतं. ऑडिओबुक ध्वनिमुद्रणाचा अनुभव अर्थातच खूप मजेशीर होता कारण तुम्ही एका बंद स्टुडिओत असता, पण तुम्हाला ती सगळी जी सिच्युएशन आहे ती तुम्हाला क्रिएट करायची असते. त्यात जो थरार असेल, भीती असेल, प्रेम प्रसंग असेल, जे काही भाव आहेत ते सगळे त्या स्टुडिओच्या आत फक्त माईक आणि तुम्ही आणि तुमची जी संहिता असते त्याच्या मार्फत तयार करायचे असते. त्यामुळे मला फार मजा येते. मला अनेकदा असे वाटते कि आपण जेव्हा ते करीत असतो, आपणच आपल्याला ऐकत असतो, आणि आपल्याला सुधारत असतो आणि ते अगदी मेडिटेटिंग आहे. मला वाटते आहे स्टोरीटेल खूप चांगली संधी देतेय ऑडियन्सला सुद्धा. अनेकदा आपल्या धावपळीच्या आयुष्यात आपल्याला वाचायला मिळत नाही. आपण गाडी चालवीत असताना, प्रवास करताना, स्वयंपाक करीत असताना, घरातील कामं करत असताना आपण वाचू शकत नसलो तरी ऐकू शकतो आणि त्यामुळे हि खूप चांगली संधी असते. अगदी नावाजलेल्या लेखकांच्या कथा कादंबऱ्यांपासून ते अगदी नव्या दमाच्या होतकरू लेखकांनी लिहिलेली मालिकांपर्यंत अगदी इरॉटिका पासून ते थरारचित्त गोष्टी, सस्पेन्स हे सगळं ऑडिओबुकमध्ये स्टोरीटेलवर आहे. ज्यांची जी आवड आहे, त्यांच्यासाठी तिथं सर्व उपलब्ध असल्याने तुम्ही इतर तुमच्या कामात व्यस्त असता तेव्हा इअर फोन लाऊन ऐकू शकता आणि आसपासच्या लोकांना कळणार नाही. हे उत्तम साधन आहे मनोरंजन आणि ज्ञानाचेही असे मला वाटते आहे.
7 / 7
ऑडिओबुक नेस्ट जनरेशनचं अपरिहार्य गॅजेट! - गौतमी देशपांडे : मला खूप दिवसांपासून ऑडिओबुकसाठी काम करण्याची इच्छा होती, आणि मला जेव्हा विचारलं आणि ऑडिओबुक बद्दल सांगितलं तेव्हा मी खूपच एक्सईट होते, ती कथाही तशी नवीन होती, खूप छान आणि गोड होती त्यामुळे मी ती वाचण्यासाठी खूप उत्सुक होते. हा माझ्यासाठी पहिला आणि छान अनुभव होता. मी फार पूर्वी कॉलेजमध्ये असताना नाट्यवाचन स्पर्धा केल्या आहेत पण कधी प्रोफेशनल ऑडिओबुक साठी काम केले नव्हते. पण खूप बरं वाटलं, कम्पलीटली नाट्यरूपात ते छान रेकॉर्ड झालं आहे. मी आणि ललितने ते केलं आहे. खूप मजा अली ते करताना आणि खूप छान अनुभव होता. अशी अनेक ऑडिओबुक्स प्रेक्षकांपर्यंत पोहचवायची खरच इच्छा आहे. लोकांनी या ऑडिओबुक्सचा आनंद घ्यावा कारण आताच्या काळातली सुंदर कथा आहे. प्रत्येक बेस्ट फ्रेंड मुलगा, मुलगी कि कथा ऐकताना स्वतःला रिलेट करू शकेल. त्यामुळे प्रत्येकाने हे ऑडिओबुक ऐकून त्याचा आस्वाद घ्यावा.