मंगेशकर आणि ठाकरे कुटुंबियांचे अगदी जवळचे संबंध आहेत. लता मंगेशकर आणि बाळासाहेबांचं नातंही खास होतं. बाळासाहेब लतादिदींच्या गाण्याचं तोंडभरून कौतुक करत तर लतादिदीही बाळासाहेबांचं राजकीय चातुर्य पाहून अवाक होत.
समजा वर्षातून कधी येणं-जाणं शक्य झाल नाही तरी आवर्जून लतादीदी आणि बाळासाहेब एकमेकांच्या वाढदिवसानिमित्त एकमेकांच्या घरी येत-जात असत. बाळासाहेबांच्या कलानगरच्या घरी मंगेशकर कुटुंबिय आवर्जून जात. बाळासाहेब लतादिदींना बहिण मानत. या बहिणभावाचं नातं खास होतं.
लतादिदींची फोटोग्राफी उत्तम होती. बाळासाहेब उत्कृष्ट व्यंगचित्रकार होते. या दोन कुटुंबाचं नातं खास आहे. कैकदा जेवणावळी व्हायच्या. असंच एकदा दोन्ही कुटुंबिय एकत्र आले असता बाळासाहेबांनी लतादिदींना एक खास ऑफर दिली ती ऑफर होती राजकारणात येण्याची...
लतादिदींनी त्यांच्या शैलीत ही ऑफर नाकारली. दिदी म्हणाल्या, "बाळासाहेब, राजकारण हा आमचा प्रांत नाही. पण तुम्ही राजकारणाच्या माध्यामातून खूप चांगलं काम करताय. तुमच्या या कार्याला माझ्या शुभेच्छा.." लतादिदींच्या उत्तराने बाळासाहेबही चकीत झाले. पण बाळासाहेबांनाही त्यांचं हे उत्तर पटलं. पुढे बाळासाहेब या विषयासंबंधी कधीही लतादिदींना विचारणा केली नाही.
मंगेशकर आणि ठाकरे कुटुंबियांचे संबंध आजही तितकेच जिव्हाळ्याचे आहेत. बाळासाहेबांनंतर उद्धव ठाकरे यांनीही हा स्नेह जपला.
बाळासाहेब ठाकरे यांच्यावर मुंबईतल्या ज्या शिवाजी पार्कवर अंत्यसंस्कार करण्यात आले त्याच शिवाजी पार्कवर आज लतादिदींवर अंत्यंसंस्कार केले जाणार आहेत.