राज कपूर यांचे पुत्र अभिनेते रणधीर कपूर यांचा आज 75 वा वाढदिवस आहे. रणधीर यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं. 1971 ते 1975 या काळात बॉलीवूडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीत त्यांचं नाव होतं. रणधीर यांची प्रेम कहानी रंजक आहे. घरच्यांच्या विरोधाला न जुमानता अभिनेत्री बबिता आणि रणधीर यांनी लग्न केलं. पण काही गोष्टींमध्ये मतभेद झाले आणि त्यांनी एकमेकांपासून वेगळं राहण्याचा निर्णय घेतला. जाणून घेऊयात त्याची वादळी लव्हस्टोरी...
अभिनेते रणधीर कपूर आणि अभिनेत्री बबिता हे पाहता क्षणी एकमेकांच्या प्रेमात पडले. रणधीर आणि बबिता अनेकदा पार्टीत आणि मित्रांसोबत एकत्र दिसत. रणधीर यांनी आपले वडील राज कपूर यांना बबिता यांच्यासोबतच्या नात्याबद्दल सांगितलं. राज कपूर म्हणाले की, "मी बबिताला चित्रपटात काम देईल पण तिला घरची सून म्हणून मी तिला स्विकारू शकत नाही." तर दुसरीकडे बबिता रणधीर यांना आपण लग्न करुयात असं वारंवार सांगत होत्या. हे दोघेही प्रेमात इतके बुडाले होते की बबिता यांच्याशी लग्न करण्यासाठी ते आपल्या आपल्या कुटुंबासोबतचे संबंध तोडण्यासही रणधीर तयार झाले. रणधीर यांनी पुन्हा एकदा राज कपूर यांच्याकडे विचारणा केली. राज कपूर यांनी मान्यता तर दिली पण एक अट टाकली.
राज कपूर म्हणाले, "मी या लग्नाला मान्यता देतो पण माझी एक अट आहे. जर तुम्हा दोघांना लग्न करायचं असेल तर बबिताला सिनेमात काम करणं थांबवावं लागेल."
रणधीर आणि बबिता एकमेकांवर जीवापाड प्रेम करत होते. लग्नासाठी बबिता यांनी आपलं करिअर सोडलं आणि 6 नोव्हेंबर 1971 ला लग्नगाठ बांधली. हा कार्यक्रम अगदी साध्या पद्धतीने झाला. यावेळी घरातील मोजकी मंडळीच उपस्थित होती.
दोघांची संसारवेल फुलत होती. या वेलीला करिश्मा आणि करिना नावाची दोन सुंदर फुलं आली. पण अश्यात एक वादळ आलं आणि या दोघांनी वेगळं राहण्याचा निर्णय घेतला. कारण होतं रणधीर यांचं व्यसन आणि त्यांचं कामाकडे दुर्लक्ष करणं. हे बबिता यांना आवडलं नाही आणि त्यांनी रणधीर यांच्यापासून वेगळं राहण्याचा निर्णय घेतला. पण जरी हे वेगळे राहत असले तरी त्यांनी घटस्फोट घेतलेला नाही. ते आजही हे दोघे भेटत असतात.