दिल्लीत जेएनयूमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन पुकारलं की बॉलिवूडमधला एक चेहरा हमखास त्या आंदोलनात पहायला मिळतो. तो म्हणजे स्वरा भास्कर...
अनेक विद्यार्थी आंदोलनांमध्ये स्वराचा सहभाग असतो. तुम्हाला आठवत असेल की, कोरोना आणि लॉकडाऊनच्या आधी दिल्लीतील शाहिनबागमध्ये सीएए आणि एनआरसीविरोधात आंदोलन झालं होतं. या आंदोलनात ती सहभागी झाली होती.
याच कायद्यांच्या विरोधात मुंबईतही आंदोलन झालं होतं. यात स्वरा भास्कर आणि कन्हैय्या कुमार सहभागी झाले होते.
इतकंच नव्हे तर विद्यार्थी नेता कन्हैया कुमारने बिहारच्या बेगुसराय या मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवली. तेव्हा त्याच्या प्रचारातही स्वरा भास्कर दिसली होती.
विद्यार्थी आंदोलनांमध्ये वारंवार दिसणारी स्वरा आणि जेएनयू यांचं खास नातं आहे. स्वरा जेएनयूची माजी विद्यार्थी आहे. तिने या विद्यापीठातून शिक्षण घेतलंय.
विद्यार्थी आंदोलनांमुळेच स्वरा विविध विषयांवर ठामपणे आपली मतं मांडताना दिसते. राजकीय, सामाजिक प्रश्नांवर बोलताना दिसते.