उस्ताद बिस्मिल्लाह खान यांचा जन्म बिहारमधील डुमराव या ठिकाणी झाला. त्यांच्या जन्मावेळी त्यांच्या वडिलांच्या तोंडून बिस्मिल्लाह शब्द बाहेर पडला आणि पुढे हेच नाव उत्साद यांची ओळख बनली.
उस्ताद बिस्मिल्लाह खान यांचे वडील पैगंबर बख्श हे महाराजा केशव प्रसाद सिंह यांच्या दरबारात सनई वाजवायचे. वयाच्या सहाव्या वर्षी उस्ताद बिस्मिल्लाह खान त्यांच्या वडिलांसोबत वाराणसीत आले आणि त्यांनी सनईच्या शिक्षणाला सुरूवात केली.
त्यांनी वयाच्या चौदाव्या वर्षी अलाहाबादच्या संगीत परिषदेत सनई वाजवली. तितून पुढे त्यांनी मागे वळून पाहिलंच नाही. बजरी, झूला, चैती या सारख्या धून त्यांनी वाजवल्या. त्यांच्या सनईवादनाने त्यांना संगीत जगतात मानाचं पान दिलं.
उस्ताद बिस्मिल्लाह खान जरी जन्माने मुस्लीम असले तरी ते इतर धर्मीयांचा आदर करायचे. ते काशी विश्वनाथ मंदिरात सनईवादन करायचे. गंगा नदीच्या किनाऱ्यावर बसून ते तासनतास रियाज करायचे. पण त्यांनी मुस्लिम धर्माच्या रितीभातीही सोडल्या नाहीत. ते रमजान महिन्यात उपवास करायचे. पाच वेळेला नमाज अदा करायचे.
त्यांना 2001 साली भारतरत्न या देशातील सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. शिवाय पद्मभूषण, पद्मश्री, तानसेन पुरस्कार, रोस्टम पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. 21 ऑगस्ट 2006 रोजी त्यांचं निधन झालं.