80 हजाराचं तिकीट, शर्टाचं कॉलर ते अंतर्वस्त्रातून तस्करी, शाहरुख खानचा मुलगा अडकलेल्या ड्रग्ज प्रकरणाची A टू Z माहिती
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान याचा मोठा मुलगा आर्यन खान हा सध्या ड्रग्ज पकडणी एनसीबीच्या ताब्यात आहे. भर समुद्रात क्रुझमध्ये सुरु असलेल्या पार्टीत ड्रग्स बाळगलं आणि सेवन केल्या प्रकरणी एनसीबीने त्याला अटक केली आहे.
1 / 9
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान याचा मोठा मुलगा आर्यन खान हा सध्या ड्रग्ज प्रकरणी एनसीबीच्या ताब्यात आहे. भर समुद्रात क्रुझमध्ये सुरु असलेल्या पार्टीत ड्रग्स बाळगलं आणि सेवन केल्या प्रकरणी एनसीबीने त्याला अटक केली आहे. एनसीबीने आर्यन याच्यासह आणखी सात जणांना ताब्यात घेतलं आहे. यापैकी आर्यन खान, त्याचा मित्र अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांना एनसीबीने आज दुपारी अटक केली. त्यानंतर त्यांना वैद्यकीय चाचणीसाठी जे जे रुग्णालयात नेण्यात आलं. त्यानंतर त्यांना मुंबईच्या किला न्यायालयात हजर करण्यात आलं. तिथे त्या तिघांना एक दिवसाची कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणात नेमक्या काय-काय घडामोडी घडल्या याच विषयाची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.
2 / 9
दिल्लीच्या एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीने तीन दिवसांच्या क्रूझ टूअरचं आयोजन केलं होतं. ही क्रूझ शनिवारी (2 सप्टेंबर) संध्याकाळी मुंबईहून गोव्याच्या दिशेला निघणार होतं. विशेष म्हणजे क्रूझमध्ये तीन दिवसांसाठी वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आणि पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं. हे क्रूझ तीन दिवसांनी पुन्हा मुंबईत येणार होतं. याच क्रूझमध्ये आर्यन खान आणि त्याचे मित्र गेले होते. या क्रूझच्या या पार्टीची इन्स्टाग्रामवरही जाहिरात करण्यात आली होती. तसेच या क्रूझने प्रवास करण्यासाठी आणि तिथल्या कार्यक्रमांचा आस्वाद घेण्यासाठी प्रत्येकी 80 हजार रुपये तिकीट होतं, अशी माहिती समोर आली आहे. याच क्रूझमध्ये आयोजित पार्टीत ड्रग्जचं सेवन केलं जाणार असल्याची माहिती एनसीबी अधिकाऱ्यांना गुप्त बातमीदारांकडून मिळाली.
3 / 9
शनिवारी संध्याकाळी क्रूझ गोव्याच्या दिशेला रवाना झालं. या क्रूझमध्ये तब्बल तीन दिवसांच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमामध्ये ड्रग्जचं सेवन केलं जाणार असल्याची खबर एनसीबीला मिळाली. त्यामुळे जहाजात आधीपासूनच एनसीबी अधिकारीसुद्धा प्रवासी म्हणून शिरले. विशेष म्हणजे जहाजात होणाऱ्या या पार्टीत सहभागी होण्यासाठी 80 हजाराचा तिकीट होतं. मुंबईहून जहाज रवाना झालं. शहरातून लांब गेल्यानंतर जहाजात पार्टी सुरु झाली. नेमकं त्याचवेळेला एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला. पार्टीत कोकेन, चरस, एमडी, एमडीएमए सारखे ड्रग्ज जप्त करण्यात आल्याचा दावा करण्यात येतोय. बॅग आणि इतर वस्तूंमध्ये लपवलेले अंमली पदार्थ एनसीबीने सील केले आहेत. अनेक तास झालेल्या कारवाईत नेमके किती किंमतीचे ड्रग्ज पकडले गेले हे अद्याप समोर आलेलं नाही.
4 / 9
एनसीबीने या कारवाईत शनिवारी रात्री उशिरा तब्बल आठ जणांना ताब्यात घेतलं. त्यामध्ये शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचाही समावेश होता. कारवाई झाल्यानंतर ड्रग्ज आणि रेव्ह पार्टीशी आपला संबंध नसल्याचा दावा आर्यन खानने केला होता. मात्र, एनसीबीच्या हाती ठोस पुरावे लागल्यानंतर आपण ड्रग्ज घेतल्याची माहिती स्वत: आर्यन खानने एनसीबीला दिली, अशी माहिती सूत्रांकडून मिळालीय. दरम्यान, आर्यन खानचा मोबाईल जप्त करुन त्यात ड्रग्ज आणि पार्टीबाबत काय-काय चर्चा झाली याचा तपास सुरु आहे.
5 / 9
एनसीबी अधिकाऱ्यांनी रात्रभर ताब्यात घेतलेल्यांची कसून चौकशी केली. या चौकशीत त्यांच्याहाती महत्त्वपूर्ण माहिती लागली. विशेष म्हणजे क्रूझमध्ये कोणकोणत्या माध्यमातून ड्रग्ज नेलं गेलं होतं ते देखील समोर आलं. सूत्रांच्या माहितीनुसार शर्टाच्या कॉलरमधील शिलाईमधून क्रूझमध्ये ड्रग्ज आणले गेले. काही महिलांनी पर्सच्या हॅण्डलमधून ड्रग्जची तस्करी केली. तर काहिंनी अंतर्वस्त्र, चप्पल आणि बुटांनी ड्रग्ज पुरवलं. आर्यन खान याने सुद्धा डोळ्यांच्या लेन्सच्या डब्ब्यामधून ड्रग्ज आणले, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
6 / 9
NCB arrest Shah Rukh Khan son Aryan Khan
7 / 9
आर्यन खानने आपण ड्रग्ज बाळगल्याचं कबूल केल्यानंतर त्याला आणि त्याच्यासह अरबाज मर्चंट, मुनमुन यांना जे जे रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जाण्यात आलं. त्यानंतर त्यांना किला कोर्टात घेऊन जाण्यात आलं. तिथे एनसीबीच्या वकिलांनी तिघांसाठी दोन दिवसांच्या कोठडीची मागणी केली. तर आर्यनची भूमिका मांडणारे वकील सतीश माने-शिंदे यांनी युक्तीवाद करत एकच दिवसांची कोठडी देण्याची मागणी केली. दोन्ही बाजूंचे युक्तीवाद ऐकल्यानंतर कोर्टाने तीनही आरोपींसाठी एका दिवसाची कोठडी सुनावली. त्यामुळे आर्यनला आपल्या साथीदारांसह आजची रात्र जेलमध्ये काढावी लागणार आहे.
8 / 9
दुसरीकडे या प्रकरणाची सर्वत्र चर्चा झाल्यानंतर बॉलिवूडचा भाईजान अभिनेता सलमान खान शाहरुख खानच्या घरी दाखल झाला. विशेष म्हणजे शाहरुख आणि सलमान यांच्यात फारसं जमून नसल्याच्या बातम्या अनेक वेळेस आलेल्या आहेत. पण भाईजानच्या आजच्या कृतीनं दोन्ही खान एकत्र आल्याचं दिसतंय. सलमान खान रात्री दहाच्यानंतर शाहरुखच्या ‘मन्नत’ ह्या बंगल्यावर दाखल झाला. अर्थातच सकाळपासूनच शाहरुखच्या घराबाहेर माध्यमकर्मींनी गर्दी केलीय. त्यामुळे शाहरुखच्या घरातून कोण बाहेर पडतंय, कोण आत जातंय यावर कॅमेऱ्यांचं बारीक लक्ष आहे. सलमान खान रात्री आला त्यावेळेस तो येत असल्याची कुणकुण पत्रकारांना लागलेलीच होती. त्यामुळे तो येताच कॅमेऱ्यांनी एकच गराडा घातला.
9 / 9
या प्रकरणात उद्या नेमकं काय घडतं ते देखील महत्त्वाचे आहे. एनसीबीने आठ जणांना ताब्यात घेतलं होतं. त्यापैकी फक्त दोघांना कोर्टात हजर करण्यात आलं आहे. तर इतर पाच जणांना उद्या नियमित न्यायालयात हजर केलं जाऊ शकतं. तर आर्यन आणि त्याच्या दोन सहकाऱ्यांची उद्या कोठडी संपेल. त्यानंतर एनसीबी त्याची कोठडी आणखी वाढवण्याची विनंती करु शकते. पण जर अर्बाज खानच्या वकिलांनी केलेला युक्तीवाद कोर्टाला योग्य वाटला तर कदाचित त्याला न्यायालयीन कोठडी, त्यापुढे जावून जामीन मिळू शकतो. या प्रकरणात पुढे काय-काय होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.