बॉलिवूड कलाकारांचे प्रेम असो वा ब्रेकअप, ते चाहत्यांमध्ये नेहमीच चर्चेत राहतात. बॉलिवूडमधल्या काही प्रेमकथा केवळ एका वाईट टप्प्यावर येऊन थांबल्या असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही. अशा दुःखद ब्रेकअप कथांपैकीच एक होती अभिनेत्री राणी मुखर्जी (Rani Mukerji) आणि अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांची. लग्नापर्यंत पोहचलेली ही प्रेमकथा अचानक ‘ब्रेकअप’च्या वळणावर येऊन थांबली होती.
‘बंटी और बबली’, ‘कभी अलविदा ना कहना’, ‘युवा’ असे चित्रपट देणारे अभिषेक आणि राणी एकाच वेळी एकमेकांच्या प्रेमात पडले होते. करिष्मा कपूरशी साखरपुडा मोडल्यानंतर अभिषेकच्या आयुष्यात राणीची एंट्री झाली होती. असे म्हणतात की, ‘बंटी और बबली’ या चित्रपटादरम्यान दोघांची चांगली मैत्री जमली होती, ज्याचे नंतर प्रेमात रूपांतर झाले.
अभिषेक आणि राणीच्या ब्रेकअपनंतर, अभिषेकच्या कुटुंबातील एका सदस्यामुळे दोघेही विभक्त झाल्याची बातमी समोर आली होती. असे म्हणतात की, अभिषेकची आई जया बच्चन याच दोघांच्या नात्यातील वितुष्टाला कारणीभूत ठरल्या. पण या दोन्ही कलाकारांनी यावर कधीही प्रतिक्रिया दिली नाही.
अभिषेक आणि राणी ‘लागा चुनरी में दाग’ या चित्रपटात काम करत होते, त्यावेळी त्यांच्या नात्यात दरी निर्माण व्हायला सुरुवात झाली होती.
चित्रपटादरम्यान दोघांमध्ये भांडण झाल्याचे वृत्त देखील समोर आले होते. यानंतर दोघांचा ब्रेकअप झाला. मात्र, तेव्हा देखील दोघांनी आपली प्रतिक्रिया दिली नाही. त्यानंतर दोघेही आपापल्या जीवनात पुढे निघून गेले.