झी मराठीवर दोन नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. एक ‘माझी तुझी रेशीमगाठ’ आणि दुसरी आहे अनोखी प्रेमकथा 'मन झालं बाजिंद'. त्यामुळे आता प्रेक्षकांच्या मनोरंजनात वाढ होणार आहे.
अल्फा मराठी आणि झी मराठीवरील आभाळमाया, अवंतिका दूरदर्शनवरील दामिनी या गाजलेल्या मराठी मालिकांसोबतच हिंदी सिनेसृष्टीमध्ये नावलौकिक मिळवलेला लोकप्रिय अभिनेता श्रेयस तळपदे आता लवकरच मराठी टेलिव्हिजनवर पुनरागमन करतोय.
छोट्या पडद्यावरून श्रेयसने आपल्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीला सुरुवात केली होती आणि आता झी मराठीवरील आगामी मालिका "माझी तुझी रेशीमगाठ" या मालिकेतून श्रेयस तळपदे पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर रसिक प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाला आहे.
आजवर मालिकांमध्ये प्रेमाचा रंग गुलाबी असलेला आपण पाहिलाय. परंतु पहिल्यांदाच मन झालं बाजिंद या मालिकेत राया आणि कृष्णाच्या प्रेमकथेत पिवळ्या रंगाची उधळण आपल्याला पहायला मिळणार आहे.
परंपरागत व्यवसायाला स्वतः कडील व्यवहार ज्ञानाने भरभराटीला नेणारा, माझं तुझं न करता प्रेमाची उधळण करणारा, त्याच्या कामाचा पसाराही मोठा आहे, असा आपला बाजिंदा नायक राया आहे. आत्मविश्वासनिर्माण करणारा हा रंग आपलं मनसुद्धा पवित्र करतो. या पिवळ्या रंगाच्या साक्षीने राया-कृष्णाची प्रेमकहाणी फुलणार आहे. या मालिकेतून अभिनेता वैभव चव्हाण आणि अभिनेत्री श्वेता राजन हे दोघे पहिल्यांदाच मुख्य भूमिकेतून प्रेक्षकांना भेटणार आहेत.