Photo: मोठमोठ्या भाषणांच्या जेव्हा ‘तिरड्या’ निघतात, आश्वासनाचं ‘स्मशान’ होतं आणि व्यवस्थेचा ‘अंत्यविधी’!
भारत आज कोरोना महामारीच्या भयानक आगीत होरपळतोय. ही फक्त आग नव्हे हा वणवा आहे. या वणव्याला जबाबदार ठरणारा प्रत्येक घटक लाखो डोळ्यांमधील अश्रूंना उत्तरदायी आहे
1 / 8
आपण सरणावरच्या प्रेताला आपुलकीचा खांदा द्यावा, असं म्हणतो. संकट काळात लोकांना मदत करावी, असं घरातील लहान मुलांना सांगतो. तसे संस्कार बिंबवतो. मात्र, अशी संस्कार बिंबवणारी, संस्कृती जगवणारी माणसंच आज सरणाशिवाय, अंत्ययात्रेशिवाय अनंतात विलिन होताय. हे कोणत्या जन्माचं पाप असेल असं हजारो मृतदेहांच्या लाखो नातेवाईकांना वाटतंय. हा भारत आज कोरोना महामारीच्या भयानक आगीत होरपळतोय. ही फक्त आग नव्हे हा वणवा आहे. या वणव्याला जबाबदार ठरणारा प्रत्येक घटक लाखो डोळ्यांमधील अश्रूंना उत्तरदायी आहे. भारतातील या भयावह दृश्यांची ठोस पुरावा दाखवणारी, मन सुन्न करणारी ही काही फोटो. हे फोटो बघितल्यानंतर तरी आपल्या सत्ताधाऱ्यांना जाग येईल, अशी आशा आहे.
2 / 8
हे जळणारे मृतदेह, काळ्या-पांढऱ्या पीपीई किटमध्ये स्मशानभूमीत टाहो फोडणारे नातेवाईक, त्यांच्या तोंडावर सुरक्षेसाठी असणारा मास्क, हे सारे दृश्य मन विषण्ण करणारे आहेत. संपूर्ण देशभरात हीच परिस्थितीती आहे. स्मशानभूमींमध्ये अत्यंविधीसाठी मृतांच्या रांगा लागल्या आहेत. महाराष्ट्र, दिल्ली, मध्य प्रदेश अनेक ठिकाणी हीच परिस्थिती आहे.
एकीकडे भारताने कोरोना काळात एवढी प्रगती केली, इतकं साधनसामग्री तयार केली. इतर देशांना मदत केली, अशी भाषणे. तर दुसरीकडे नि:ब्द करणारी ही भयान परिस्थिती. या तिरड्या फक्त निरापराध लोकांच्या नाहीयेत. या तिरड्या आश्वासनांच्या भाषणांची आहेत. आणि संपूर्ण व्यवस्थेची अंत्यविधी होतेय.
3 / 8
देशाची राजधानी दिल्लीसह अनेक शहरामंध्ये स्मशानभूमी, शवागृह, कब्रस्तान सगळ्या ठिकाणी आज कोरोनामुळे मृत्यू झालेल्या मृतदेहांचा खच पडला आहे. स्मशानभूमी 24 तास सुरु आहेत. अनेक स्माशानभूमींबाहेर मोठ्या रांगा लागल्या आहेत. परिस्थिती हाताळण्यात आता प्रशासनही हतबल होताना दिसतंय.
4 / 8
देशात आतापर्यंत 1.73 कोटी नागरिकांना कोरोनाची लागण झालीय. यापैकी 1.43 कोटी लोकांनी कोरोनावर मात केलीय. पण 1.95 लाख लोकांचा या महामारीत बळी गेला आहे. देशभरात दररोज शेकडो लोकांचा मृत्यू होतोय.
5 / 8
दिल्लीत सध्या कोरोनाबाधितांच्या आकडा प्रचंड वाढतोय. दिल्ली आणि आजूबाजूच्या शहरांमध्ये सर्व स्मशानभूमी, कब्रस्तान फुल झाले आहेत. स्मशानभूमींबाहेर मोठ्या रांगा लागल्या आहेत. मृतांच्या अत्यंविधीसाठी आता जागेसह लाकडांचीही कमतरता भासू लागली आहे.
6 / 8
भारतात कोरोनाची दुसरी लाट प्रचंड घातक ठरली आहे. ही लाट नाही तर अक्षरक्ष: त्सुनामीच आहे, असं अनेकांचं मत आहे. कोरोनाचा नवा विषाणू हा आता रुग्णांच्या थेट फुफ्फुस्यांवर परिणाम करतोय. शरीराच्या श्वसन प्रक्रियेवर हा विषाणू घात करतोय. त्यामुळे रुग्णाचा जीव गुदमरतो. परिणामी ऑक्सिजनची मागणी वाढली आहे.
7 / 8
रुग्णांलयांच्या बाहेर रुग्णांच्या उपचारासाठी रांगा लागल्या आहेत. अनेक ठिकाणी एका बेडवर दोन रुग्णांना झोपवलं जातंय. ज्या रुग्णांवा उपचारासाठी बेड मिळत नाहीय त्यांचे नातेवाईक रस्त्यांवर वणवण फिरताना दिसत आहेत.
8 / 8
भारतात सोमवारी सलग पाचव्या दिवशी सर्वाधिक नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. 24 तासात तब्बल साडेतीन लाख नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले. तब्बल 2812 रुग्णांचा मृत्यू झाला. तुम्ही ही बातमी वाचत असाल तोपर्यंत आणखी शेकडो रुग्णांचा मृत्यू झालेला असेल. त्यानंतर या रुग्णांचे मृतदेह तासंतास स्मशानभूमीबाहेर अंत्यविधीसाठी रांगेत राहतील.