चक्रीवादळ दानाचा परिणाम आता दिसू लागला आहे, आज रात्री उशिरा हे चक्रीवादळ ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या या चक्रीवादळाचा परिणाम मोठ्या प्रमाणात पश्चिम बंगालवर देखील होणार आहे.
तासी 110 ते 120 कलोमीटर वेगानं हे वादळ ओडिशाच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. या वादळाच्या पार्श्वभीवर ओडीशा आणि पश्चिम बंगालमध्ये हवामान खात्याकडून हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.
दाना चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर जवळपास पाचशे ट्रेन रद्द करण्यात आल्या असून, पुढील 16 तास या भागांमधील विमानांची उड्डानं देखील रद्द करण्यात आली आहेत.एनडीआरएफची पथक देखील तैनात करण्यात आली आहेत.
दाना चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. ओडिशा आणि पश्चिम बंगाल या दोन राज्यांमध्ये अतिमुसळधार पाऊस होणार असून, हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.
महाराष्ट्राबाबत बोलायचं झाल्यास महाराष्ट्रात देखील पुढील 24 तासांमध्ये वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.
महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात पावसाची शक्यता असून, वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार आहे.
दरम्यान मुंबईमध्ये पुढील 24 तास ढगाळ वातावरण राहणार असून, काही भागांमध्ये मध्यम ते हलक्या पावसाची शक्यता आहे, असं हवामान विभागाकडून सांगण्यात आला आहे.