एकनाथ शिंदेंच्या बंडाने महाराष्ट्रात चांगलाच राजकीय भूकंप आला. बंडखोर आमदारांना घेऊन एकनाथ शिंदे गुवाहाटीला गेले. आज संपूर्ण शिंदे गट गोव्याला रवाना होणार आहे. त्याआधी त्यांनी कामाख्या देवीचं दर्शन घेतलं.
पावला पावलावर, प्रत्येक कोपऱ्यावर पोलीस, रस्ते ब्लॉक, कडेकोट बंदोबस्तात शिंदे गटातील कामाख्या देवीच्या दर्शनाला पोहचले. यावेळी आमदारांच्या सुरक्षेची काळजी पावलोपावली घेण्यात येत असल्याचं दिसून येतंय.
2 बसेसमधून बंडखोर आमदार कामाख्या देवीच्या दर्शनाला पोहचले. आसामला मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आलीये त्यामुळे खबरदारी म्हणून शिवसेनेचे बंडखोर आमदार आजच गोव्याच्या दिशेने रवाना होणार आहेत.
कामाख्या देवीच्या दर्शनानंतर बंडखोर आमदार गुवाहाटीच्याच हॉटेलमध्ये परतणार आहेत. दुपारी 3.30 च्या सुमारास आमदार गोव्याच्या दिशेनं रवाना होणार आहेत.
राजकारणात नवी सुरुवात म्हणून एकनाथ शिंदे यांनी देवीचं दर्शन घेतलं. त्यांची देवावर फार श्रद्धा असल्याचं बोललं जातं. दरम्यान आज सगळ्याच आमदारांनी मंदिरात दर्शनासाठी हजेरी लावली.
महाराष्ट्राबाहेर ठेवलेल्या एकनाथ शिंदे गटातील बंडखोर आमदारांनाआता बहुमत चाचणीसाठी महाराष्ट्रात आणण्याचं मोठं आव्हान आहे. शिवसेनेच्या कोणत्याही आवाहनाला किंवा धमक्यांना बळी न पडलेल्या आमदारांना बहुमत चाचणीपर्यंत शिवसेना नेत्यांपासून दूर ठेवण्यासाठी मोठी खबरदारी घेतली जात आहे.