धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची मुलगी ईशा देओलच्या घटस्फोटाच्या वृत्ताने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. लग्नाच्या 11 वर्षांनंतर ईशाने पती भरत तख्तानीला घटस्फोट दिला. ईशा आणि भरतच्या विभक्त होण्याच्या वृत्ताने चाहत्यांना धक्का बसला असला तरी देओल कुटुंबीयांना त्याविषयी काही आश्चर्य वाटलं नाही, असं कळतंय.
यामागचं कारण म्हणजे ईशा आणि भरत यांच्या नात्यात बऱ्याच काळापासून आलेला दुरावा. हे नातं अचानक तुटलं नाही, तर गेल्या बऱ्याच काळापासून त्यांच्यात तणाव होताच. याच कारणामुळे हेमा मालिनी यांच्या 75 व्या वाढदिवसाच्या पार्टीला भरत कुठेच दिसला नव्हता.
गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात जेव्हा ईशाने तिचा वाढदिवस साजरा केला, तेव्हासुद्धा भरत अनुपस्थित होता. कौटुंबिक कार्यक्रमांपासून तो दूरच राहू लागला होता. ईशा आणि भरतने आधीच आपले मार्ग वेगळे केले होते. म्हणूनच देओल कुटुंबाला त्याविषयी काही आश्चर्य वाटलं नाही, असं म्हटलं जातंय.
ईशा आणि भरत यांनी घटस्फोटाचा निर्णय खूप आधीच घेतला होता. फक्त तो जाहीर करण्यासाठी ते योग्य वेळेची प्रतीक्षा करत होते. घटस्फोटाच्या या निर्णयात हेमा मालिनी या मुलीच्या बाजूने आहेत, असंही समजतंय. मुलीच्या कोणत्याच निर्णयात त्या हस्तक्षेप करणार नाहीत, असं जवळच्या व्यक्तीने सांगितलंय.
हेमा मालिनी यांचा ईशाला पाठिंबा असून त्या घटस्फोटावर कधीच टिप्पणी करणार नाहीत. हा ईशा आणि भरत यांचा निर्णय असल्याने त्यावर त्या कधीच सार्वजनिकरित्या बोलणार नाहीत, असंही म्हटलं जातंय.