माढा : कृषीपंपाचा विद्युत पुरवठा खंडीत केल्याने केवळ रब्बी हंगामातील पिकांचाच नाही तर जनावरांच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. एकीकडे उन्हाच्या झळा वाढत आहेत तर दुसरीकडे महावितरणकडून विद्युत पुरवठा खंडीत करण्याचा शॉक दिला जात आहे. शेतकरी दुहेरी संकटात असून किमान महावितरण कंपनीने तरी शेतकऱ्यांच्या समस्या समजावून घेणे गरजेचे आहे. गेल्या काही दिवसांपासून माढा तालुक्यातील निमगाव येथील विद्युत पुरवठा खंडीत केल्याने पिके तर करपून जात आहेतच पण जनावरांना पाणी द्यायचे कसे? असा सवाल उपस्थित करीत या परसरातील शेतकरी जनावरे घेऊन थेट महावितरणच्या उपकेंद्रात दाखल झाले होते. जनावरे गेटला आणि शेतकऱ्यांचा अधिकाऱ्यांना घेराव असे चित्र निमगाव उपकेंद्रावर पाहवयास मिळाले आहे.