देशभरात सध्या गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू आहे. दहा दिवसांपर्यंत गणेशोत्साची धूम असते. येत्या 7 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी असून 17 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे. या दहा दिवसांत गणपती बाप्पाची मनोभावे पूजा-अर्चना केली जाते.
गणेशोत्सवातील या दहा दिवसांत गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी विविध पदार्थ बनवले जातात. मोदक तर बाप्पाला प्रियच आहे, मात्र त्याचसोबत इतरही काही पदार्थ त्यांना खूप आवडतात, असं मानलं जातं.
मोदक: गणपती बाप्पाला सर्वांत प्रिय मोदक आहेत. गणपतीच्या पूजेनंतर उकडीच्या मोदकांचं नैवैद्य आवर्जून दाखवलं जातं. मोदकांचा नैवेद्य दाखवल्यास गणपती बाप्पा त्यांच्या भक्तांवर प्रसन्न होऊन त्यांना सुखसमृद्धीचा आशीर्वाद देतात, अशी मान्यता आहे.
मालपुआ: मालपुआ हा गोड पदार्थ शंकराला खूप प्रिय आहे. पण त्याचसोबतच त्यांचे पुत्र गणपती बाप्पालाही मालपुआ खूप आवडतात, असं म्हटलं जातं. म्हणूनच गणेश चतुर्थीला बाप्पाला मालपुआचं नैवेद्य दाखवल्यास ते नक्कीच तुमच्यावर प्रसन्न होतील.
गणपती बाप्पाला मोदक तर आवडतातच, पण त्याचसोबत त्यांना लाडूसुद्धा खूप प्रिय आहेत. तुम्ही मोतीचूर, बेसन किंवा बुंदीचे लाडू त्यांना अर्पण करू शकता.
मखाण्याची खीर: दहा दिवसांच्या गणेशोत्सवादरम्यान नवव्या दिवशी बाप्पाला दूध आणि मखाण्याची खीर यांचं नैवेद्य दाखवावं. त्यानंतर ही खीर प्रसादाच्या रुपात ग्रहण करावी. नैवेद्यात मखाण्याची खीर शुभ मानलं जातं.
नैवेद्यासोबतच देव भक्ताचा भावसुद्धा पाहतात. त्यामुळे जरी तुम्ही कोणताही विशेष पदार्थ बनवून त्याचं नैवेद्य दाखवू शकला नाहीत तरी फक्त बाप्पाला गुळ अर्पण करू शकता. गुळ हे पारंपरिक नैवेद्य मानलं जातं आणि त्यामुळे बाप्पासुद्धा प्रसन्न होतात, अशी मान्यता आहे.