शाहरुख खानच्या मालकीच्या कोलकाता नाइट रायडर्सला नवीन हिरो मिळाला आहे. त्याचं नाव आहे रिंकू सिंह. काल राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात रिंकू हिरो ठरला.
रिंकूने 23 चेंडूत 42 धावा ठोकल्या. यात सहा चौकार आणि दोन षटकार होते. 'करो या मरो' मॅचमध्ये त्याने केकेआरला विजय मिळवून दिला.
कोलकाता नाइट रायडर्सचा फलंदाज रिंकू सिंहला गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळालं होतं. सीजनमधील पहिलाच सामना खेळणाऱ्या रिंकूने आपल्या प्रदर्शनाने क्रिकेट चाहत्यांना प्रभावित केलं होतं.
गुजरात टायटन्स विरुद्धच्या सामन्यात रिंकू सिंहने उत्तम फिल्डिंगही केली. त्याने चार कॅच पकडल्या. ज्यातील तीन कॅच शेवटच्या ओव्हरमध्ये पकडल्या. फिल्डिंगनंतर फलंदाजीतही रिंकूने आपला दम दाखवला. तो 35 धावांची उपयुक्त इनिंग खेळला. यात चार चौकार आणि एक षटकार होता.
12 ऑक्टोबर 1997 रोजी उत्तर प्रदेशच्या अलीगढमध्ये रिंकू सिंहचा जन्म झाला. क्रिकेटपटू बनण्यापर्यंतचा त्याचा प्रवास सोपा नव्हता. पाच भावंडांमध्ये रिंकू तिसरा आहे. त्याचे वडील गॅस सिलिंडर पोहोचवण्याचं काम करायचे. कुटुंबाची आर्थिक स्थिती बेताची असल्याने क्रिकेटर बनण्याच स्वप्न साकार करण्यासाठी त्याला प्रचंड मेहनत घ्यावी लागली.
कठीण परिस्थितीचा सामना करणाऱ्या रिंकूने झाडू मारण्याची नोकरी केलीय. ऑटो रिक्षा सुद्धा चालवली आहे. बेताची आर्थिक परिस्थिती असलेल्या कुटुंबातून तो पुढे आला आहे.
रिंकू सिंहच शिक्षण फार झालेलं नाहीय. 9 वी पर्यंत त्याचं शिक्षण झालं आहे. नववीची परिक्षा तो पास करु शकला नाही. दिल्लीत एका स्पर्धेत त्याला मॅन ऑफ द सीरीज म्हणून बाइक मिळाली होती. ती त्याने आपल्या वडिलांना देऊन टाकली.
रिंकूला 2014 मध्ये उत्तर प्रदेशकडून लिस्ट ए आणि टी 20 मध्ये डेब्यूची संधी मिळाली. त्यानंतर दोन वर्षांनी त्याने पंजाब विरुद्ध फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पाऊल ठेवलं. रिंकू सिंहने आतापर्यंत 30 फर्स्ट क्लास मॅचेसमध्ये पाच सेंच्युरी आणि 16 हाफ सेंच्युरी झळकवल्या आहेत. त्याने 2307 धावा केल्या आहेत.
आयपीएल 2017 च्या लिलावाआधी रिंकू सिंहला पंजाब किंग्सने 10 लाख रुपयांमध्ये विकत घेतलं होतं. त्या सीजनमध्ये त्याला फक्त एक मॅच खेळण्याची संधी मिळाली.
2018 पासून रिंकू केकेआरकडून खेळतोय. आयपीएल 2022 च्या लिलावात रिंकूला केकेआरने 55 लाख रुपयांमध्ये विकत घेतलं.