भारतीय क्रिकेट टीमचा खेळाडू ऋषभ पंत हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वांत महागड्या खेळाडू ठरला आहे. आयपीएलच्या लिलावात लखनऊ सुपर जायंट्सने त्याला 27 कोटी रुपयांना विकत घेतलं.
याचप्रकारे ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज मिशेल स्टार्कला सौदी अरबच्या जेद्दामध्ये आयपीएल 2025 च्या लिलावादरम्यान मोठी रक्कम मिळाली. स्टार्कला दिल्ली कॅपिटल्सने 11.75 कोटी रुपयांना विकत घेतलं. आयपीएलमध्ये खेळाडूंना मिळणाऱ्या या रकमेतून किती टॅक्स कापला जातो, याबद्दल जाणून घेऊयात..
भारतीय खेळाडूंना 10 टक्के आणि परदेशी खेळाडूंना 20 टक्के टीडीएस कापल्यानंतर आयपीएलचे पैसे मिळतात. खेळाडूंना ही रक्कम मिळण्यापूर्वी त्यांना बीसीसीआय आणि फ्रँचाइजी या दोघांसोबत एक सामंजस्य करार करावा लागतो.
जर एखाद्या फ्रँचाइजीने पैसे दिले नाही तर बीसीसीआय ते पैसे देणार आणि फ्रँचाइजीच्या केंद्रीय महसुलातून ती रक्कम कापली जाणार. सीए (डॉ.) सुरेश सुराना यांनी 'बिझनेस टुडे'शी बोलताना सांगितलं की आयपीएल फ्रँचाइजी ही भारतीय खेळाडूंना एक ठरलेली रक्कम देते, जी खेळातून कमवलेली रक्कम समजली जाते.
आयपीएलमधून कमावलेल्या पैशांना त्यांच्या वर्षभरातील कमाईत जोडून आयकर स्लॅबच्या हिशोबाने टॅक्स कापला जातो. ज्या खेळाडूंची रक्कम जास्त असते, जसं की ऋषभ पंत आणि श्रेयस अय्यर त्यांना सरचार्ज आणि सेससोबतच 30 टक्के टॅक्ससुद्धा द्यावा लागतो.
दिनेश जोतवानी यांनी सांगितलं की, "आयकर अधिनियम, 1961 चा कलम 115BBA अंतर्गत, जे परदेशी खेळाडू भारतीय नागरिक नाहीत आणि भारताचे निवासी नाहीत, त्यांच्यावर विशेष टॅक्स नियम लागू होतो."
या नियमांनुसार, जर ते भारतातील एखाद्या खेळात सहभाग घेत असतील, जाहिरात करत असतील किंवा खेळाशी संबंधित भारतीय वर्तमानपत्रांमध्ये, मासिकांमध्ये किंवा जर्नल्समध्ये लिहित असतील, तर त्यांच्या कमाईवर 20 टक्के टॅक्स लागतो.
भारतात उत्पन्न कमावत असतील तर 20 टक्के TDS (स्रोतावर कापला जाणारा कर) लागू होतो. याचा अर्थ असा की त्यांना भारतात पॅनसाठी नोंदणी करण्याची गरज नाही.
लखनऊने ऋषभ पंतला एकूण 27 कोटी रुपयांना विकत घेतलं आहे. परंतु ही रक्कम तीन सिझन 2025, 2026 आणि 2027 साठी आहे. त्यामुळे त्याला एकाच वेळी ही पूर्ण रक्कम मिळणार नाही.
त्याचसोबत आयकर विभाग पंतच्या एकूण कॉन्ट्रॅक्ट रकमेतून 8.1 कोटी रुपये कापून घेणार. त्यामुळे ऋषभ पंतला तीन वर्षांच्या कॉन्ट्रॅक्ट रकमेसाठी आयपीएल टीमकडून 18.9 कोटी रुपये वेतन म्हणून मिळेल.