पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रातील सत्ताधारी भाजप विरोधात तिसरी आघाडी करण्याच्या हालचालींनी मागील काही दिवसांपासून जोर धरला आहे. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आज मुंबई दौऱ्यावर होते. या दौऱ्यात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेत देशातील राजकीय स्थितीवर चर्चा केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर केसीआर शरद पवार यांच्या 'सिल्व्हर ओक'वर दाखल झाले. शरद पवार आणि केसीआर यांच्यात जवळपास दीड तास चर्चा झाली.
या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल, खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह तेलंगणातील काही आमदार, खासदार आणि नेतेही उपस्थित होते.
महत्वाची बाब म्हणजे या भेटीदरम्यान पंतप्रधान मोदी आणि भाजपवर जोरदार हल्ला चढवणारे अभिनेते प्रकाश राज यांची उपस्थिती चर्चेचा विषय बनली होती.
या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना केसीआर यांनी नव्या आघाडीचा एल्गार लवकरच बारामतीतून होणार असल्याचा दावा केला. तर शरद पवार यांनी तेलंगणा सरकारचं कौतुक करत, आजच्या बैठकीत राजकीय विषयांसह बेरोजगारी, गरिबी, शेतकरी आत्महत्या आदी विषयांवर चर्चा झाल्याची माहिती दिली.
तत्पूर्वी केसीआर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेत त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली. यावेळी शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांचे धाकटे पुत्र तेजस ठाकरेही उपस्थित होते.
या बैठकीनंतर आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत देशातील परिवर्तनाची सुरुवात महाराष्ट्रात होणार असल्याचं केसीआर म्हणाले. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देशात सुडाचं राजकारण वाढत आहे. मग देशाला भविष्य काय? असा सवाल करत भाजपला एकप्रकारे आव्हानच दिलं आहे.