लेबनॉनमधील पेजर स्फोटाचे केरळ कनेक्शन? 15 वर्षांपासून तयारी, अनेक देशांमध्ये रचला सापळा
लेबनॉनमधील काही दिवसांपूर्वी एका मागे एक पेजरमध्ये स्फोट झाले होते. हिजबुल्लाच्या अतिरेक्यांच्या पेजरमध्ये हे स्फोट झाल्यावर संपूर्ण जग हादरले. पेजर स्फोटात हिजबुल्लाचे 20 दहशतवादी ठार झाले आणि हजारो जखमी झाले आहेत. हिजबुल्लाने या स्फोटांसाठी इस्रायलच्या मोसाद या गुप्तचर संस्थेला जबाबदार धरले आहे. त्याचवेळी अमेरिकन एजन्सीने हे पेजर इस्रायलने बनवल्याचा दावा केला आहे.
1 / 5
गेल्या 15 वर्षांपासून या हल्ल्याचा कट रचला जात होता. हल्ल्याच्या नियोजनात शेल कंपन्यांचा सहभाग होता. गुप्तचर अधिकाऱ्यांनीच या कंपन्या स्थापन केल्या होत्या. हिजबुल्लाच्या अतिरेक्यांच्या पेजरमध्ये झालेल्या स्फोटाचे केरळ कनेक्शन समोर आले आहे. या प्रकरणात केरळमध्ये जन्मलेला एका नागरिकाचे नाव समोर आले आहे. हा व्यक्ती आता नॉर्वेचा नागरिक आहे.
2 / 5
हंगेरियन मीडियानुसार, नॉर्टा ग्लोबल लिमिटेड नावाची बल्गेरियन कंपनी पेजर डीलमध्ये सहभागी होती. या कंपनीचे संस्थापक रिन्सन जोस हा नॉर्वेचे नागरिक आहे. केरळमधील माध्यमांनी दावा केला आहे की, रिन्सन जोस याचा जन्म केरळमधील वायनाडमध्ये झाला. तो एमबीए करण्यासाठी नॉर्वेत गेला. काही स्थानिक वाहिन्यांनी त्याचे काही नातेवाईक अजूनही केरळमध्ये असल्याचे म्हटले आहे.
3 / 5
रिन्सनचे वडील जोस मूथीडम हे एका दुकानात टेलरचे काम करतात. लोक त्यांना टेलर जोस म्हणून ओळखतात. ज्या पेजरमध्ये स्फोट झाले त्यात तैवानची कंपनी गोल्ड अपोलोचे नाव लिहिले आहे. परंतु गोल्ड अपोलोचे सीईओ चिंग कुआंग यांनी हे पेजर त्यांच्या कंपनीने बनवले नसल्याचे म्हटले आहे.
4 / 5
इस्त्रायलने हिजबुल्लाहला लक्ष्य ठेऊन अनेक देशांमध्ये गेल्या पंधरा वर्षांपासून सापळे लावले. गोल्ड अपोलोचे सीईओंनी पेजर ब्लास्टसाठी हंगेरीतील एक कंपनी एएसी कन्सल्टिंगचे नाव घेतले. ही कंपनी पेजर बनवत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या कंपनीसोबत त्यांनी तीन वर्षांचा करार केला आहे. हंगेरीतील माध्यमांनुसार, बीएसी कन्सल्टिंगने व्यवहारात मध्यस्थ म्हणून काम केले. या कंपनीचे कार्यालयही नाही.
5 / 5
बल्गेरियाच्या नॉर्टा ग्लोबलची स्थापना केरळमध्ये जन्मलेल्या रिन्सन जोस यांनी केली होती. बीएसी कन्सल्टिंगने गोल्ड अपोलो आणि नॉर्टा ग्लोबल या दोन्हींसोबत पेजर्ससाठी डील केले होते. रिन्सन यांनी 2022 मध्ये स्वतःची कंपनी स्थापन केली. त्याच्या ऑफिसचा पत्ता सोफिया होता.