Marathi News Photo gallery Mahabharat actor Nitish Bharadwaj claims estranged wife abducted twin daughters files complaint against her for mental harassment
माझ्या मुलींना 4 वर्षांपासून दूर ठेवलं, हे अपहरणच; ‘महाभारत’मधील कृष्णाचे पत्नीवर गंभीर आरोप
महाभारत या गाजलेल्या मालिकेत कृष्णाची भूमिका साकारणारे अभिनेते नितीश भारद्वाज सध्या त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहेत. त्यांनी त्यांच्या IAS पत्नीविरोधात थेट पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे. गेल्या चार वर्षांपासून जुळ्या मुलींना भेटू देत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
1 / 6
'महाभारत' या गाजलेल्या मालिकेत कृष्णची भूमिका साकारणारे अभिनेते नितीश भारद्वाज यांनी पत्नी स्मिता गाटे यांच्याविरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. छळ आणि अयोग्य वर्तनाबाबत त्यांनी बुधवारी भोपाळच्या पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार दिली आहे. नितीश यांच्या पत्नी स्मिता या मध्यप्रदेश मानवी हक्क आयोगात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून काम करतात.
2 / 6
नितीश यांनी त्यांच्या तक्रारीत पत्नी स्मितावर बरेच आरोप केले आहेत. देवयानी आणि शिवरंजनी या आपल्या जुळ्या मुलींना भेटू देत नसल्याचं त्यांनी म्हटलंय. त्याचप्रमाणे स्मिता या मुलींना माझ्यापासून दूर ठेवण्यासाठी सतत त्यांच्या शाळा बदलत असल्याचाही आरोप नितीश यांनी केला आहे.
3 / 6
नितीश यांनी पोलीस आयुक्तांना या प्रकरणात हस्तक्षेप करून मुलींची भेट घडवून आणण्याची विनंती केली आहे. हे प्रकरण सध्या चौकशीसाठी तपास अधिकारी फाल्गुनी दीक्षित यांच्याकडे सोपवण्यात आलं आहे. नितीश भारद्वाज आणि त्यांच्या आयएएस पत्नी स्मिता यांनी लग्नाच्या 12 वर्षांनंतर घटस्फोटासाठी अर्ज केला होता. 2009 मध्ये या दोघांनी लग्न केलं होतं. तर सप्टेंबर 2019 मध्ये ते विभक्त झाले. स्मिता या जुळ्या मुलींसोबत सध्या इंदौरमध्ये राहत आहेत.
4 / 6
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत नितीश म्हणाले, "मला माझ्या मुलींची काळजी आहे. कारण गेल्या चार वर्षांपासून मला त्यांच्यापासून दूर ठेवलंय. आता या घटनेला मी अपहरण का म्हणू नये? त्या महिलेची ही सवयच आहे की खोटं बोलून लोकांची सहानुभूती मिळवावी."
5 / 6
"गेल्या चार वर्षांपासून तिने मला माझ्या मुलींपासून दूर ठेवलं. ही सर्वसामान्य वागणूक नाही. याला ऑब्सेसिव्ह बिहेविअर म्हणतात. ही वागणूक पाहून मला असं वाटतं की तिचं मानसिक संतुलन ठीक नाही. या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे. मी तिच्या घरी गेलो आणि तिथे माझ्यावर काही चुकीचे आरोप लावले गेले, तर त्यात मीच अडकेन. मला त्या चक्रव्युहात फसायचं नाहीये", असंही ते म्हणाले.
6 / 6
पत्नीवर आरोप करत ते पुढे म्हणाले, "माझ्यावर गंभीर क्रिमिनल आरोप लावण्याची संधी कशी आणि कधी मिळतेय, याचीच ती वाट पाहतेय. ही संधी मी स्वत:हून तिला कधीच देणार नाही. माझी माझ्या मुलींशी समोरासमोर भेट घडवून द्यावी. त्या ठीक आहेत, हेच मला सुनिश्चित करायचं आहे. म्हणूनच मी पोलीस आयुक्तांकडे विनंती केली आहे."