आज मकर संक्रांत निमित्त श्री. विठ्ठल व श्री.रूक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात तसेच मंदिरात फुल फळे भाजी व पतंगाची सुंदर व आकर्षक नयनरम्य आरास करण्यात आली आहे. हे दृष्य पाहून सर्वांच्या तोंडून कांदा, मुळा भाजी अवघी विठाई माझी असे वाक्य येत आहे.
मकर संक्रांतीच्या निमित्ताने आज श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विविध 60 प्रकारच्या भाजीपाल्यांची आरास केली आहे त्यामुळे देवाचा गाभारा हिरव्या भाजी पाल्याने बहरला आहे. मंदिरात विविध फळ भाज्यांची शेती बहरल्याचा भाविकांना अनुभव येत आहे.
मकर संक्रांत नवीन वर्षातील पहिला सण असल्याने पंढरपुरात श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात तब्बल 60 प्रकारच्या फळभाज्या आणि एक हजार पतंग तसेच तिळगुळ आणि विविध फुलांचा वापर करत अनोखी सजावट केली आहे. ही सजावट पुणे येथील श्री विठ्ठल भक्त राहुल ताम्हाणे यानी केली आहे.
श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचा गाभारा , सोळखांबी ,चारखांबि अशा मंदिराच्या विविधभागाना गाजर , मुळा ,फ्लोवर ,कोबी, टोमेटो मेथी, पालक, शेपू, तांदूळसा, भेंडी, गवार, कारले, वांगे, बटाटा, बिट सोबत अगदी सराटी, घोळ, चिघळ, कुर्डू, केळफूल, कडवंची, हदगाचिंचेचा चिगोरफूल, चंद्र नवखा, देवडांगरं अशा ६० प्रकारच्या भाज्या एकत्रित करून सजवले आहे.
तर काही ठिकाणी तिळगूळ आणि संक्रांतीला अनेक ठिकाणी पतंग उडवण्याची परंपरा असल्याने जवळपास एक हजार पतंग वापरून ही सजावट अधिकच सुंदर केली आहे या सजावटीमुळे श्री विठ्ठल रुक्मिणीमातेचे रुप अधिकच खुलून दिसत आहे. फोटो सौजन्य : Vitthal Rukmini Today darshan | प्रतिनिधी : रवी लव्हेकर