कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहीम प्रगतीपथावर आहे
या मोहिमेअंतर्गत महानगरपालिकेच्या स्वयंसेवकांची चमू प्रत्येक घरी जाऊन कुटुंबातील सदस्यांची प्राथमिक माहिती नोंदवून घेत आहे.
यावेळी घरोघरी जाऊन तपासणी करणाऱ्या आणि आरोग्य शिक्षण देणाऱ्या स्वयंसेवकांना सहकार्य करण्याचं आवाहन पुन्हा एकदा महानगरपालिकेनं केलं आहे.
या मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात सुमारे 7 लाख घरांमधील 24 लाख नागरिकांचे सर्वेक्षण पूर्ण झालं आहे.
यामध्ये वय, लिंग यासह मधुमेह, रक्तदाब यासारख्या सहव्याधींची माहिती घेण्यासह कुटुंबातीलप्रत्येक सदस्याचे तापमान व ऑक्सिजन पातळी देखील नोंदवून घेण्यात येत आहे.
महापालिकेच्या सर्व 24 विभागातील सर्वेक्षणाच्या टक्केवारीचा स्वतंत्रपणे विचार करावयाचा झाल्यास 'बी' विभागाची टक्केवारी सर्वाधिक आहे.
या विभागातील 37.12 टक्के घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. या खालोखाल 'एल' विभागातील 33.69 घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. तर 'सी' विभागातील 28.69 टक्के कुटुंबांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे, अशीही माहिती महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे देण्यात आली आहे.