आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी अनेकय खेळाडू प्रचंड मेहनत करतात. पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वांनाच संधी मिळतेच असं नाही. त्यामुळे अशा खेळाडूंचं करियर हे सुरु होण्याआधीच संपुष्टात येतं. असंच काहीसं झालं ते प्रथम श्रेणी क्रिकेटमधील पदार्पणात द्विशतक करणाऱ्या मुंबईकर अमोल मुजुमदारसोबत.
शानदार कामगिरीनंतरही त्याचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं स्वप्न अधुरच राहिलं. अमोल मुजुमदारने 1993-94 मध्ये रणजी करंडक स्पर्धेतून हरियाणाविरोधात प्रथम श्रेणी पदार्पण केलं. या पहिल्या सामन्यात त्याने 260 धावांची धमाकेदार द्विशतकी खेळी केली.
प्रथम श्रेणी पदार्पणात मुजुमदारने वर्ल्ड रेकॉर्ड केला. विशेष म्हणजे आजही हा वर्ल्ड रेकॉर्ड कायम आहे. मुजुमदार फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये दमदार कामगिरी करत होता. यामुळे तो दुसरा तेंडुलकर म्हणून ओळखला जाऊ लागला. मुजुमदारची 19 वर्षाखालील वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाच्या उपकर्णधारपदी निवड करण्यात आली.
मुजुमदार आणि राहुल द्रविड समवयस्क. दोघेही त्यावेळेस फर्स्ट क्लासमध्ये नावारुपास आले. दोघे 1995 मध्ये इंग्लंड ए विरुद्ध 3 अनधिकृत वनडे आणि कसोटी सामने खेळले. यामधील कसोटीमध्ये इंडिया ए संघाला 3-0 ने पराभव स्वीकारावा लागला. मुजुमदार फ्लॉप ठरला. तर द्रविड हीट ठरला. वनडे सीरिजमध्ये 2-1 ने विजय मिळवला.
मुजुमदारने या एकदिवसीय मालिकेत 79 आणि 69 धावा केल्या. या इंग्लंड ए विरोधातील कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये सौरव गांगुलीही होता. मात्र तो अपयशी ठरला.