झी मराठी वाहिनीवरील 'नवरी मिळे हिटलरला' या मालिकेचं कथानक अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. एजेला लीलाच्या सर्व इच्छा पूर्ण करायच्या आहेत आणि तिची प्रत्येक इच्छा कशी पूर्ण होईल याची खात्री करण्याचं तो ठरवतो.
लीलाला एजेकडून एकदम फिल्मी स्टाईल प्रपोजल हवंय, जसं जिमी शेरगील रिषितासाठी ट्रेनच्या लेडीज डब्यात चढून प्रपोज करतो अगदी तसं. लीलाच म्हणणं आहे की जसं आपलं नातं युनिक आहे तसं प्रपोजलही युनिकच हवं. प्रेमात असंच असतं. इम्पॉसिबल वाटणाऱ्या गोष्टीच करायच्या असतात.
तिची दुसरी इच्छा आहे की एजेने आपल्याला छान थंड प्रदेशात घेऊन जावं. जिथे छान बर्फ असेल आणि बर्फाच्या मध्ये उभं राहून रोमँटिक डान्स करावा. तिला मस्त शिकारा राइडही करायची आहे. या सगळ्या इच्छा एजे पूर्ण करणार आहे. कारण एजे आता खरंच लीलाच्या प्रेमात पडलाय.
या सर्व रोमँटिक सीन्सच्या शूटबाबत लीलाची भूमिका साकारणारी अभिनेत्री वल्लरी विराजने आपला अनुभव व्यक्त केला. "आम्ही काश्मीरला गेलो होतो. तिथे आम्ही चार दिवस शूट केलं. आम्ही निसर्गमय बर्फाच्या चादर ओढलेल्या वेगवेगळ्या ठिकाणी शूटिंग केले, जसं गुलमर्ग आणि श्रीनगर."
"तिकडे शूटिंग करण इतकं सोपं नव्हतं. कारण प्रचंड थंडी होती. पण बर्फात शूट करायची मज्जा काही वेगळीच होती. आम्ही गुलमर्गला बर्फात एजे-लीलाचा प्रोपोजल सीन शूट केला. गुलमर्गमध्ये बर्फात साडी नेसून एक गाणं ही शूट केलं गेलं, जो माझ्यासाठी एक मोठा टास्क होता," असं ती म्हणाली.
"मला साडीत खूप थंडी वाजत होती. मी पूर्ण वेळ कुडकुडत होते. जसा सीन कट झाला, तसं मला आमचं युनिट लगेच जॅकेट आणून देत होतं. खासकरून 'नवरी मिळे हिटलरला'ची क्रिएटिव्ह मनालीने माझी खूप काळजी घेतली. एजे म्हणजेच राकेश बापटनेही मला खूप साथ दिली," अशा शब्दांत वल्लरीने अनुभव सांगितला.
"जेव्हा मी ते स्क्रीनवर पाहिलं तेव्हा माझी उत्सुकता आणखी वाढत गेली. आम्ही दल लेकला शिकारामध्ये बसूनही शूट केलं. तो ही एक छान अनुभव होता. हे सगळं स्क्रीनवर बघताना प्रेक्षकांना एक वेगळाच अनुभव मिळणार आहे. काश्मीरला शूट करण्याचा हा अनुभव सदैव माझ्या स्मरणात राहील", असं वल्लरी म्हणाली.