Marathi News Photo gallery Ganeshotsav 2021 Arrival of Ganpati Bappa at the residences of CM Uddhav Thackeray, Dhananjay Munde, Radhakrishna Vikhe Patil, Dilip Walse Patil, Sadabhau Khot, Keshav Upadhye, Harshvardhan Patil
Photo : राजकीय गणेशोत्सव; मुख्यमंत्र्यांसह सर्वपक्षीय नेतेमंडळींच्या घरी गणरायाचं आगमन
गणेशोत्सवानिमित्त राज्यात उत्साहाचं वातावरण आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे यंदाचाही गणेशोत्सव साध्या पद्धतीनं साजरा करण्याचे आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आलं आहे. अशावेळी मुंबई, पुण्यासह राज्यात विविध भागात साधेपणाने गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आलीय. राजकीय नेतेमंडळींच्या घरीही अगदी साधेपणाने गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे.
1 / 7
आज वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या हस्ते श्रीगणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते. जे जे अमंगल आहे ते नष्ट होवो, अशी प्रार्थना मी गणरायाच्या चरणी केली आहे. कोरोनाविरुद्ध जनतेला जागरूक करण्यासाठी आणि या संकटातून आपली मुक्तता व्हावी म्हणून आपण सर्वानी एक जबाबदार नागरिक म्हणून प्रयत्न करायला हवेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
2 / 7
प्रवरा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळी श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी शालिनी विखे यांच्यासह कारखान्याचे पदाधिकारी उपस्थित होते. कोणत्याही समाजाच्या उत्सवावर बंधनं घालणं योग्य नाही. आता विघ्नहर्त्यानेच सरकारला सुबुद्धी द्यावी अशी प्रार्थना यावेळी विखे-पाटील यांनी केलीय.
3 / 7
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी आज परळी येथील निवासस्थानी सहकुटुंब श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली. यावेळी श्रींची विधिवत पूजा करून धनंजय मुंडे यांनी सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी मुंडे यांनी महाराष्ट्रावरील व देशावरील कोविडचा संसर्ग तसेच राज्यातील अतिवृष्टी व पूराचे विघ्न दूर होऊदे असे साकडे विघ्नहर्ता श्री गणरायाला घातले.
4 / 7
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर गावातील घरी लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन झालं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साध्या पद्धतीनं आणि गर्दी टाळत गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. कोरोनाचं संकट लवकर दूर व्हावे यासाठी वळसे-पाटील यांनी बाप्पाकडे प्रार्थना केली.
5 / 7
भाजप नेते आणि माजी संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या इंदापुरातील भाग्यश्री निवासस्थानीही आज लाडक्या गणरायाचं आगमन झालं. त्यावेळी विधिवत पद्धतीनं गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली. यावेळी पाटील यांच्या पत्नी, मुलगा आणि कन्या अंकिता पाटील उपस्थित होत्या. गणरायाचं आगमन म्हणजे आनंद आणि उत्साहाची एक पर्वणीच असते अशी प्रतिक्रिया अंकिता पाटील यांनी यावेळी दिली.
6 / 7
भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनीही आपल्या निवासस्थानी विधिवत आणि मनोभावे गणपतीची प्रतिष्ठापना केली. यावेळी गणपती बाप्पा मोरयाचा गजर करण्यात आला. सर्व उपाध्ये कुटुंबिय यावेळी उपस्थित होते.
7 / 7
रयत क्रांती संघटनेचे नेते आणि माजी कृषी राज्यमंत्री आमदार सदाभाऊ खोत यांच्या इस्लामपुरातील घरी विघ्नहर्ता गणपती बाप्पाचं आगमन झालं. मोठ्या भक्तीमय वातावरणात खोत यांच्या घरी गणरायाचं स्वागत करण्यात आलं. यावेळी शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकारला सद्बुद्धी देण्याचे मागणी सदाभाऊ खोत यांनी केली.