अयोध्येतील राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला आहे. 12.29 च्या शुभमुहूर्तावर प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते पूजा पार पडली.
रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या विधीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मूर्तीसमोर साष्टांग दंडवत प्रणाम केला. या ऐतिहासिक क्षणांसाठी केवळ अयोध्याच नव्हे, तर सगळा देश सजला आहे. देशभरात रामभक्तीचे वातावरण आहे.
प्राण प्रतिष्ठा सोहळ्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरातील महत्त्वाच्या मंदिरांमध्ये दर्शन घेतलं. शनिवारी त्यांनी तमिळनाडूमधील दोन प्राचीन मंदिरांमध्ये प्रार्थना केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक डॉ. मोहन भागवत, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रमुख उपस्थितीत प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला. अमिताभ बच्चन, रजनीकांत, उद्याोजक मुकेश अंबानी आणि गौतम अदानी, क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्यासह देशभरातील शेकडो मान्यवर आणि साधुसंतांच्या साक्षीने रामजन्मभूमीवरील नव्या मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला.
प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या वेळी गर्भगृहात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, सरसंघचालक मोहन भागवत, राज्यपाल आनंदी बेन पटेल, राम जन्मभूमी ट्रस्टचे अध्यक्ष महंत नृत्य गोपाल दास उपस्थित होते.