आषाढी एकादशीला होणाऱ्या विठ्ठलाच्या महापूजेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सपत्नीक पंढरपूरच्या दिशेनं रवाना झाले आहेत. खराब हवामान आणि मुसळधार पावसामुळे पंढरपूरच्या दिशेनं विमानाने जाणं शक्य नसल्यामुळे मुख्यमंत्री रस्तेमार्गानंच पंढरपूरच्या दिशेनं निघाले आहे.
यावेळी मुख्यमंत्री स्वत: ड्रायव्हिंग करत आहेत. यावेळी नेहमीची मर्सिडीज ऐवजी रेंज रोव्हर गाडी घेऊन मुख्यमंत्री पंढरपूरकडे रवाना झाले. ही गाडी आदित्य ठाकरे वापरत असतात. पण सध्या पावसाचा धोका, तुंबलेलं पाणी यामुळे उंच गाडी हवी, म्हणून मुख्यमंत्री ते वापरत असलेली मर्सिडीज ऐवजी आदित्य ठाकरे वापरत असलेले रेंज रोव्हर गाडी घेऊन पंढरपूरकडे रवाना झाले.
सध्या मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर तुफान पाऊस आहे. समोरची दृष्यमानता कमी आहे. अशावेळी मुख्यमंत्री सफाईदारपणे गाडी चालवत आहेत. मुख्यमंत्र्यांसोबत पत्नी रश्मी ठाकरेही शेजारच्या सीटवर आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रात्री 9 वाजताच्या सुमारास पंढरपुरात पोहोचतील.
मुख्यमंत्री विमानाने मुंबईतून सोलापूरला जाऊ शकत होते, मात्र सध्याचं हवामान आणि दृश्यमानता कमी असल्याने ते बाय रोड अर्थात रस्ते मार्गे पंढरपूरकडे रवाना झाले.
मुंबईते पंढरपूर या प्रवासादरम्यान मुख्यमंत्री लोणावळाजवळ काही वेळ चहापानासाठी, विश्रांतीसाठी थांबण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सध्या मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर मुसळधार पाऊस सुरु आहे. एक्सप्रेस वेवर काही ठिकाणी पाणी साचल्याचंही पाहायला मिळत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील सर्व गाड्यांचे पार्किंग लाईट्स ऑन करुन ड्रायव्हिंग केलं जात आहे.