MPSC उत्तीर्ण स्वप्नील लोणकरच्या आत्महत्येनंतर विद्यार्थी आक्रमक, नवी मुंबई-पुण्यासह राज्यभर आंदोलनं
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्यानं पुण्यातील स्वप्नील लोणकरने दोन दिवसांपूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली. एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन दीड वर्षे झाली तरी नियुक्ती न झाल्याने नैराश्यातून त्याने टोकाचं पाऊल उचललं. या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात भाजप, मनसेसह विद्यार्थ्यांनी आंदोलनं केली
1 / 9
एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी मिळत नसल्याच्या नैराश्यातून स्वप्निल लोणकर या युवकाने पुण्यात आत्महत्या केली. महाविकास आघाडी सरकारच्या बेजबाबदार धोरणामुळेच स्वप्निल लोणकरचा मृत्यू झाल्याचा आरोप भाजपने केला आहे. या घटनेच्या निषेधार्थ कोल्हापुरात आज भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली.
2 / 9
भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांसह युवा मोर्चाचे कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी महाविकास आघाडी सरकार विरोधात आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
3 / 9
स्वप्निलची आत्महत्या नसून ही महाविकास आघाडी सरकारने केलेली हत्या असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. महाविकास आघाडी सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील यावेळी आंदोलकांनी केली. या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे यांना देण्यात आले.
4 / 9
दुसरीकडे, ज्या पुण्यात स्वप्नील लोणकरने आत्महत्या केली, तिथेही विद्यार्थ्यांचा संताप पाहायला मिळाला. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आंदोलन केले.
5 / 9
स्वप्नीलला न्याय मिळावा, रखडलेली नोकर भरती ताबडतोब व्हावी, एमपीएससीच्या परीक्षा घ्याव्यात या मागणीसाठी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अभाविपने आंदोलन केलं.
6 / 9
दरम्यान, औरंगाबादेतही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी आक्रमक झाले. विद्यार्थ्यांनी तीव्र आंदोलन करत रस्त्यावरच ठिय्या मांडला होता.
7 / 9
जवळपास 400 ते 500 विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. राज्य सरकारच्या विरोधात विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले.
8 / 9
स्वप्नील लोणकरच्या आत्महत्येनंतर नवी मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही आक्रमक झाली. वाशीच्या शिवाजी चौकातून विधान भवनावर पायी निघालेला मोर्चा अडवत पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले होते.
9 / 9
पोलिसांनी अडवल्यानंतरही मनसेच्या नेत्यांची भाषणे होती सुरुच होती. आंदोलनात 30 ते 40 कार्यकर्ते सहभागी झाले होते. पोलिसांनी आंदोलकांना वाशी पोलीस स्टेशनमध्ये नेले.