उंदराच्या बिळासमोर आलोय, बाहेर ये, उद्धव साहेब आमचे दैवत आहेत, त्यांच्यावर बोलायची हिंमत करु नये, असा इशारा युवासेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांनी दिला. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुंबईतील जुहू भागातील बंगल्यावर सरदेसाईंच्या नेतृत्वात युवासेनेने धडक मोर्चा काढला.
वरुण सरदेसाईंच्या मोर्चावर पोलीसांनी लाठीमार केला. यामुळे नारायण राणेंच्या घरासमोर राडा झाल्याचं पाहायला मिळालं. शिवसैनिक आणि नारायण राणे समर्थक कार्यकर्ते यावेळी एकमेकांना भिडले.
त्यांच्या हजार काठ्या खाऊ, हे बांडगुळ आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी वरुण सरदेसाईंनी केली. आमच्या दैवतावर टीका केली, आम्हाला आव्हान दिलं होतं, सिंहाच्या इलाक्यात उंदराच्या बिळासमोर आलोय, असंही सरदेसाई म्हणाले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर पातळी सोडून टीका केल्याचे प्रकरण आता केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना भोवण्याची शक्यता आहे.
"मी तिथे असतो तर कानाखाली लगावली असती" या वक्तव्याबद्दल नारायण राणे यांच्यावर पोलिसांकडून गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांना अटक करण्यात येणार आहे
वरुण सरदेसाई हे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे मावसभाऊ म्हणजेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंच्या भगिनीचे पुत्र. वरुण सरदेसाई यांच्याकडे युवासेनेच्या सचिवपदाची जबाबदारी आहे.