अभिनेत्री दीपिका पादुकोण सात महिन्यांची गरोदर असून येत्या सप्टेंबर महिन्यात ती बाळाला जन्म देणार आहे. नुकत्याच एका पोस्टमध्ये दीपिकाने प्रेग्नंसीमध्ये ती काय काय खातेय याविषयीचा खुलासा केला आहे. त्याचप्रमाणे डाएटिंगबद्दलही तिने लिहिलंय.
दीपिकाने तिच्या इन्स्टाग्रामवर समोसा, ब्राऊनी, बन-बटर या पदार्थांचे फोटो पोस्ट केले आहेत. त्यावर तिने लिहिलं, 'माझ्या फीडवर हे सर्व पदार्थ पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसला का? असो, मी हे सगळं खाते. जे लोक मला ओळखतात, त्या सर्वांना ही गोष्ट माहित आहे.'
'त्यामुळे तुम्ही जे काही ऐकाल किंवा वाचाल, त्यावर विश्वास ठेवू नका. हे सर्व खाण्याची माझी एक ट्रिक आहे, ते म्हणजे बॅलेन्स (संतुलन), कंसिस्टन्सी (सातत्य) आणि आपल्या शरीराचं ऐकणं', असं तिने लिहिलंय.
डाएटविषयी ती पुढे म्हणते, 'डाएट या शब्दाबद्दल लोकांच्या मनात बऱ्याच गैरसमजुती आहेत. लोकांना असं वाटतं की डाएट म्हणजे उपाशी राहणं, कमी खाणं आणि ते सर्व खाणं जे आपल्याला आवडत नाही. पण डाएटचा खरा अर्थ आहे, कोणत्याही व्यक्तीद्वारे खाल्ल्या जाणाऱ्या भोजनाची एकूण मात्रा.'
'डाएट हा शब्द मूळ ग्रीक शब्द 'डाएटा'वरून आला आहे. त्याचा अर्थ आहे की आयुष्य जगायची पद्धत. मी नेहमीच संतुलित आहारावर भर दिला आहे आणि माझी आयुष्य जगण्याची हीच पद्धत आहे', असंही तिने लिहिलंय.
'मी कधीच असा डाएट फॉलो केला नाही जो मी सलग आणि सातत्याने फॉलो करू शकणार नाही. तुम्हाला माहित आहे का, मी आतासुद्धा ते सर्व पदार्थ खाते, जे तुम्ही या फोटोमध्ये पाहू शकता. पण ही माझी आयुष्य जगण्याची पद्धत नाही', असं तिने पोस्टच्या अखेरीस स्पष्ट केलं.
दीपिकाची ही संपूर्ण पोस्ट वाचल्यानंतर आपण असं म्हणू शकतो की संतुलित आहार आणि अशाप्रकारचं डाएट जो एखादी व्यक्ती सातत्याने पाळू शकते, तेच दीपिकासुद्धा फॉलो करते.