Marathi News Photo gallery Pune Corona Update Deputy CM Ajit Pawar announces relaxation of Corona restrictions in Pune, What started, what closed?
Pune Unlock : व्यापाऱ्यांच्या आक्रमकतेनंतर अखेर पुण्यातील कोरोना निर्बंधांत शिथिलता! काय सुरु, काय बंद?
व्यापाऱ्यांच्या आक्रमकतेपुढे नमतं घेत अखेर पुण्यातील कोरोना निर्बंधांमध्ये शिथिलता देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थित पार पडलेल्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. त्यानुसार पुण्यातील दुकानं, हॉटेल्सना वेळ वाढवून देण्यात आली आहे. तर मॉल्सही सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
1 / 7
पुणे, पिंपरी चिंचवड महानगरातील सर्व दुकाने सर्व दिवशी सकाळपासून रात्री 8 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. हॉटेलही रात्री 10 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. त्याचबरोबर कोराना नियमांचे पालन करुन मॉलही उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस घेतलेल्यांनाच मॉलमध्ये प्रवेश मिळणार आहे.
2 / 7
दुकाने, हॉटेल पूर्ण वेळ सुरू ठेवण्यास परवानगी दिली असली तरी पॉझिटिव्हिटी रेट 7 टक्क्यांच्यावर गेल्यास कडक निर्बंध लावण्यात येतील. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे. आता बाधितांची संख्या कमी झाली असली तरी ती पुन्हा वाढू नये यासाठी कोरोना दक्षता नियमांचे काटेकोर पालन होणे आवश्यक आहे. त्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं.
3 / 7
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती व उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती निलमताई गोऱ्हे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार वंदनाताई चव्हाण, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित होते.
4 / 7
पुणे तसेच पिंपरी चिंचवड महानगरामध्ये निर्बंधामध्ये शिथिलता देण्यात आली आहे. मात्र पुणे जिल्ह्यातील 13 तालुक्यात लेव्हल तीनची नियमावली सोमवारपासून लागू केली आहे. ग्रामीणचा रुग्णवाढीचा दर 5.5 टक्के आहे. पण तिथे लेव्हल 4 ऐवजी 3 ठेवली आहे. पुणे, पिंपरी चिंववड महानगरात शिथिलता देण्यात येत असली तरी कोरोना वाढणार नाही याची खबरदारी प्रत्येकोने घेतली पाहीजे, असं अजितदादा म्हणाले.
5 / 7
पुणे जिल्ह्यासंदर्भात कोणताही निर्णय घेताना सर्वांची मते विचारात घेत निर्णय घेण्यात येतात. आपल्या सर्वांची मते विचारात घेत निर्बंधामध्ये शिथिलता देण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं.
6 / 7
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण आरोग्य यंत्रणा सुसज्ज ठेवण्यासोबतच 19 ऑक्सीजन प्लॉन्ट सुरू झाले आहेत, 34 प्लांन्ट प्रस्तावित आहेत, नजीकच्या कालावधीत ऑक्सीजन प्लांट गतीने सुरू होतील, जिल्ह्याला ऑक्सीजनबाबत स्वंयपूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी यंत्रणेला दिल्या.
7 / 7
हॉटेल आणि रेस्टॉरंटला 50 टक्के क्षमतेसह सुरू करण्याची परवानगी आहे. प्रत्येक 15 दिवसांनी मॉलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी कोरोना चाचणी करणे बंधनकारक आहे. ग्रामीण भागात हॉटेल फक्त 4 वाजेपर्यंत खुले राहतील, असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.