Marathi News Photo gallery Rahul Mahajan talks about divorce fourth marriage baby planning and alimony to his ex wives Dimpy Ganguly Shweta Singh
राहुल महाजन त्याच्या 3 पूर्व पत्नींना किती पोटगी देतो? स्वत:च केला खुलासा
दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचा मुलगा राहुल महाजन त्याच्या चौथ्या लग्नामुळे चर्चेत आला आहे. नुकताच राहुलने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर एका महिलेसोबत फोटो पोस्ट केला. हा फोटो पाहिल्यानंतर राहुल तिच्याशी चौथ्यांदा लग्न करणार की काय, असा प्रश्न नेटकऱ्यांनी केला आहे.
1 / 7
दिवंगत नेते प्रमोद महाजन यांचा मुलगा राहुल महाजन अनेकदा त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेचा विषय ठरला. राहुलने नुकताच सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आणि त्यानंतर त्याच्या चौथ्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं. यासोबतच राहुलच्या आधीच्या तीन लग्नांविषयीही नेटकऱ्यांमध्ये चर्चा सुरू झाली. एका मुलाखतीत राहुल त्याच्या वैवाहिक आयुष्यातील समस्यांविषयी व्यक्त झाला होता.
2 / 7
तिसरी पत्नी नताल्या इलिनाला घटस्फोट दिल्यानंतर थेरपिस्टकडून मदत घेत असल्याचा खुलासा राहुलने या मुलाखतीत केला होता. त्याचप्रमाणे नताल्याकडून बाळ हवं होतं आणि तिचा त्यास नकार होता, म्हणून घटस्फोट झाल्याच्या चर्चांवरही त्याने मौन सोडलं.
3 / 7
नताल्याच्या आधी राहुलचं दोन वेळा लग्न झालं होतं. मात्र आपण कोणत्याच पूर्व पत्नीला पोटगी देत नसल्याचं त्याने स्पष्ट केलं. कारण घटस्फोट हा परस्पर संमतीने झाल्याने कोणत्याच पूर्व पत्नीला पोटगी देत नाहीये, असं तो म्हणाला.
4 / 7
या मुलाखतीत राहुल म्हणाला, "भावनांशी कसं डील करावं, यासाठी मी थेरपिस्टची मदत घेतोय. आपल्या देशात मानसोपचारतज्ज्ञांकडून मदत घेण्याकडे नकारात्मक दृष्टीकोनातून पाहिलं जातं. पण मला ती मदत घेण्यात काहीच लाज वाटत नाही. घटस्फोट म्हणजे माझ्या आयुष्यातील जणू भूकंपच आहे. त्या भूकंपाचे धक्के मला अजूनही जाणवत आहेत. माझ्या मनावर खूप मोठा आघात झाला आहे. पण तुम्हाला स्ट्राँग रहावंच लागतं."
5 / 7
"नताल्यासाठी माझ्या मनात अजूनही प्रेम आणि आदर आहे. प्रेम कधीच मरत नाही. मी तिच्या संपर्कात नाही आणि आता ती कुठे आहे हेसुद्धा मला माहीत नाही. पण प्रेम एकाएकी असं संपत नाही. याक्षणी मी नवीन नात्यात अडकण्यासाठी अजिबात तयार नाही", असं तो म्हणाला.
6 / 7
मूल हवंय या वादामुळे घटस्फोट दिल्याच्या चर्चांवरही राहुलने मौन सोडलं. तो पुढे म्हणाला, "मला या नात्यात तिच्याकडून कधीच बाळ नको होतं. आम्ही त्यासाठी कधी प्रयत्नसुद्धा केले नाहीत. फक्त डिंपी आणि मी बाळासाठी प्रयत्न करत होतो, पण तिचा गर्भपात झाला. नताल्या आणि मला बाळ नकोच होतं. मी आता 48 वर्षांचा आहे आणि मला आता बाळ नकोच आहे. तिच्याविषयी माझ्या मनात कोणतंच वितुष्ट नाही."
7 / 7
राहुल आणि नताल्या यांनी 2018 मध्ये लग्न केलं. त्यावेळी राहुल 43 वर्षांचा आणि नताल्या 25 वर्षांची होती. त्याआधी राहुलने डिंपी गांगुलीशी लग्न केलं होतं. या दोघांचं लग्न फक्त पाच वर्षे (2010-2015) टिकलं. 2006 मध्ये राहुलने श्वेता सिंहशी लग्नगाठ बांधली होती. मात्र लग्नाच्या दोन वर्षांतच त्यांचा घटस्फोट झाला. श्वेता आणि डिंपीने राहुलवर कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप केला होता.